उत्कृष्ट वाचक म्हणतात, ‘आम्ही वाचनातूनच घडत गेलो...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:33 AM2018-08-11T00:33:52+5:302018-08-11T00:34:46+5:30

जळगाव येथील १४१ वर्षांची परंपरा असलेल्या व.वा.वाचनालयाच्या वार्षिक सभेत ‘उत्कृष्ट वाचकां’चा सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे जुने सदस्य, चौफेर वाचन असलेल्या पाच वाचकांची ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून संचालक मंडळाने निवड केली. वाचनाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, इतर वाचकांना प्रोत्साहन मिळावे आणि मुख्य म्हणजे वाढत्या ‘मोबाइल वेड’च्या जमान्यात वाचन संस्कृती टिकून राहावी यासाठी गेल्या चार वर्षांपासून वाचनालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उत्कृष्ट वाचकांशी साधलेला संवाद. पुस्तकांनी आचारविचार, नीती, मूल्ये व यशाबरोबर जीवनभराची भाकरी दिली. पुस्तकांनी दिलेले सुंदर विचार व उत्तम संस्कार यामुळेच चुकीच्या गोष्टींपासून आपण दूर राहू शकलो असल्याचे हे पुरस्कार प्राप्त वाचक नमूद करतात. याबाबत रवींद्र मोराणकर यांनी या पुरस्कार प्राप्त वाचकांशी साधलेला संवाद..

The best reader says, 'we went through the reading ...' | उत्कृष्ट वाचक म्हणतात, ‘आम्ही वाचनातूनच घडत गेलो...’

उत्कृष्ट वाचक म्हणतात, ‘आम्ही वाचनातूनच घडत गेलो...’

Next


सर्वात जुने सभासद
सध्याच्या व.वा.वाचनालयाचे जे सभासद आहेत त्यात मी सर्वात जुना सभासद आहे. १९७२ पासून मी आजीव सदस्य आहे. त्यावेळी मी तीन रुपये डिपॉझीट भरल्याचे आठवते. मला शाळेत फारशी वाचनसंधी उपलब्ध झाली नाही. पण शालांत परीक्षेनंतर वाचनात रस वाटू लागला. मग मी सभासद झालो. कथा, कादंबरी, नाटके, ऐतिहासिक, चरित्र, प्रवास वर्णन अशा सर्व प्रकारचे साहित्य वाचतो. वि. स खांडेकर, रणजित देसाई, ना. स. इनामदार, बाबा कदम, आचार्य अत्रे, ना. सी. फडके यासारख्यांचे सर्व साहित्य वाचले. आता मी ८९ वर्षांचा आहे. तरीही रोज थोडे वाचतो. उत्कृष्ट वाचक म्हणून पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांनी रोज थोडे अवांतर वाचन करावे असे वाटते. आता प्रत्येक शाळेत भरपूर पुस्तके आहेत.
-माधवराव यादवराव पाटील, सेवानिवृत्त लेखाधिकारी, जि.प., जळगाव />
चौफेर वाचनावर भर
मी १९८५ सालापासून व.वा.
वाचनालयाचा सभासद आहे. माझे वाचन कथा, कादंबरी इ. ललित साहित्यापासून ते सर्व प्रकारचे सामाजिक, चरित्रग्रंथ व आध्यात्मिक ग्रंथापर्यंत चौफेर असे आहे. वृत्तपत्रातील माहितीपर वाचनासोबतच साहित्य वाचतो. टीव्ही, मोबाइल, इंटरनेटपेक्षा वाचनावर जास्त भर आहे. सध्याच्या माहिती स्फोटाच्या युगात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळणारी माहिती ही तात्पुरती व अपूर्ण असते. त्यापेक्षा ग्रंथांमधून उपलब्ध असणारी माहिती ही सविस्तर आणि जास्त खात्रीलायक असते, असा माझा अनुभव आहे. त्यासाठी बालवयापासूनच मुलांना वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. मुलांच्या हातात मोबाइल फोन न देता पुस्तके दिली गेली पाहिजेत. वाचनातून अपरिमित आनंद मिळवू शकलो. -भास्कर श्रावण महाजन, सल्लागार, रासायनिक, अभियंता, जळगाव />नामवंतांचे साहित्य वाचले
मी गेल्या ३०-३२ वर्षांपासून वाचनालयाची आजीव सभासद आहे. घरात सुरवातीपासूनच सर्वांना वाचनाची आवड होती. तेव्हा टी.व्ही. नव्हते आणि पुस्तकं, मासिक हीच माहिती व मनोरंजनाचे साधन होते. वाचनालयाने इतकी वर्षे वेगवेगळया विषयांची पुस्तके उपलब्ध करून देऊन साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखकांचे विचार वाचायची संधी दिली. विविध विषयांचे ज्ञान मिळाले. वाचनालयाने उत्तम वाचक निवडण्याचा उपक्रम निवडला. यामुळे वाचनाकडे कल वाढेल, असे वाटते. -सुधा चंद्रकांत दुबळे, सेवानिवृत्त लघुलेखक, जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव

नियमित वाचन
घरात सांस्कृतिक वातावरण, वडील रमाकांत पाठक जळगावला विकास मंडळात नाटकात काम करीत असत. त्यामुळे त्यांचे मित्र काका पाटणकर यांचे घरी येणे असे. नाटक, नाटककार यावर चर्चा होत. त्यातून नाटके वाचायची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात राजा महाजन, म.ना. अदवंत मराठी शिकवत. शिकवताना काय वाचा हे सांगत. महाविद्यालयातून पुस्तके घेऊन मी लगेच वाचत असे. महाविद्यालयात असताना आणि नंतर दररोज किमान दोनशे पानांचे पुस्तक वाचले जाई. आज देखील विविध कलावंत यांची चरित्रे, त्यांच्या कार्याविषयीची पुस्तके, विविध भागातील अनुवादित पुस्तके वाचतो. नामवंत प्रकाशनांची पुस्तके वाचण्यासाठी निवडतो. त्यामुळे निराश होत नाही. आजदेखील दररोज किमान दोनशे पाने वाचून होतात. -विजय पाठक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जळगाव

पुस्तके वाचनातूनच घडलो
माझे मायबाप ऊसतोडणी कामगार व शेतमजूर म्हणून हरेगाव, ता.श्रीरामपूर येथे साखर कारखान्यात काम करायचे. कारखान्याने कामगारांसाठी ऐसपैस झोपड्यांची वाडी उभारलेली होती. तेथील कामगार अशिक्षित होते. त्यांनी सर्व मिळून मराठा हे आचार्य अत्रे यांचे वर्तमानपत्र लावले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची पार्श्वभूमी होती. मी तिसरीत असताना मला रोज हे वर्तमानपत्र सर्वांना मोठ्याने वाचून दाखवावे लागे. अत्रे यांंचे अग्रलेखही हशा व टाळ्या यासह वाचत असे. याचा मला भाषा, उच्चार व शब्दसंग्रह यासाठी खूप उपयोग झाला. महाविद्यालयात कथा कादंबरी, ललित, प्रवासवर्णन, नाटके, चरित्र, वैचारिक, परीक्षणे, माहितीपर पुस्तके वाचली. हल्ली वैचारिक, तात्त्विक, आत्मचरित्रात्मक पुस्तके वाचतो. शोषितांची चरित्रे वाचली. या वाचनातूनच मी घडलो. प्रथम शिक्षक झालो. नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात सुटलो व अधिकारी झालो. -नीळकंठ रामचंद्र गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी, जळगाव
 

Web Title: The best reader says, 'we went through the reading ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.