पावसाळ्यात सापांपासून रहा सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:10+5:302021-06-16T04:21:10+5:30
सापांबद्दलची भीती मनातून काढणे गरजेचे : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांचा नागरी वस्तीत वावर ...
सापांबद्दलची भीती मनातून काढणे गरजेचे :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सापांचा नागरी वस्तीत वावर मोठ्या प्रमाणात वाढत असतो. त्यात जळगाव शहरात गेल्या दोन दिवसात सर्पदंशामुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर एका घरात दोन मुलांचा बालंबाल जीव वाचला आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात घरात साप शिरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक विषारी साप आढळत असले तरी जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांच्या विविध जातींपैकी निमविषारी सापांची जास्त संख्या असून, नागरिकांनी खबरदारी घेतल्यास व मनात भीती न बाळगल्यास सर्पदंश झाल्यावरदेखील योग्य उपचारामुळे व माहितीमुळे अनेकांचे जीव वाचू शकतात.
जळगाव जिल्ह्यात आढळणाऱ्या सापांमध्ये केवळ ६ साप हे विषारी आहेत. त्यातही आपल्या भागात वावरणारे फक्त ४ प्रजातींचे साप विषारी आहेत. त्यात नाग, घोणस, मण्यार, पोवळा यांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटली की बाकी सगळे माणसाचा जीव घेतील असे धोकेदायक नाहीत आणि विषारी सर्पदंश झालाच तरी सर्पदंशावर प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.
पावसाळ्यातच का आढळतात साप?
पावसाळा सुरू झाला आहे तरी देखील पावसाळ्याचे सुरुवातीचे काही दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. उन्हाळ्यात खूप ऊन पडल्यामुळे साप हे थंड आणि दमट जागा शोधतात. त्यामुळे साप हे मानवी वस्तीत भक्ष्य आणि आसरा शोधण्यासाठी येतात. उन्हाळ्याच्या अखेरीस काही सापांचा प्रजननाचा काळ सुरू होत असतो. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन ते तीन सापदेखील आढळतात.
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
पोवळा : सापाचे शास्त्रीय नाव येट्राफाय फॉलिओफीस मेलेनुरूस आहे. लांबट-सडपातळ शरीर, शेपूट आखूड, डोक्यावर दोन पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि शेपटीखालील गुदद्वारापासून टोकापर्यंत त्वचा आकाशी रंगाची व त्यावर काळे ठिपके असतात. हा साप भीती दाखविण्यासाठी शेपटी गोल करून तांबूस-नारिंगी भाग दर्शवितो. त्याची लांबी ही सरासरी १४ इंच असते.
नाग: नागाची ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकटकाळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे.
घोणस : घोणसला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकराच्या शिट्टीप्रमाणे असतात. घोणसचे विष अतिशय जहाल असते. त्याचे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणाऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही.
मण्यार : घराच्या जवळपास, बागेत, गवतात, झुडपात, पडक्या इमारतीत या ठिकाणी मण्यार आढळतो. तो मुख्यत: निशाचर आहे. अन्न शोधण्यासाठी तो रात्री हिंडतो. तो दिवसा सहजासहजी बाहेर पडत नाही. लहान साप हे त्याचे मुख्य भक्ष्य असून उंदीर, पाली, सरडे व बेडूक यांसारखे लहान प्राणी तो खातो. मण्यार आपल्या भागातील सर्वात विषारी साप समजला जातो.
आपल्याकडे आढळणारे बिनविषारी साप
धामण : या सापाची लांबी २.२५-२.५० मी. किंवा त्याहून अधिक असू शकते. त्याच्या रंगाच्या दाट करडा, पिवळसर अथवा तपकिरी अशा विविध छटा आढळतात. शरीराचा घेर सु. १० सेंमी. असतो. शेपूट टोकदार असून त्याची लांबी शरीराच्या सुमारे एक-चतुर्थांश असते. मान बारीक असून डोके लांबट व स्पष्टपणे वेगळे दिसते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळ्या असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा सोनेरी असतो.
वाळा : हा साप मुख्यत्वेकरून आशिया व आफ्रिकेत सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो. ओल्या जमिनीतील अळ्या किडे हे याचे अन्न आहे.
दिवड : हा एक बिनविषारी चिडखोर साप आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सापाला विरोळा अथवा इरूळा असं देखील म्हणतात. प्रमाण भाषेत याला दिवड म्हणतात. हा साप गटारात, डबक्यात, नदीत अथवा पाण्याजवळ राहतो. दिवड हा पोहोण्यामध्ये तरबेज सर्प आहे. तो बिनविषारी साप आहे. रंगाने पिवळसर व गडद खाकी असतो.