सावधान..यंदाची आखाजी पडणार महागात, जुगार खेळला तर थेट ‘जेलची हवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:24 PM2021-05-11T22:24:11+5:302021-05-11T22:25:40+5:30
येणाऱ्या आखाजीला जुगार खेळताना आढळून आल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे.त्यामुळे हौशानवशांचा हिरमोड होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : खान्देशातील आखाजी सण नव्हे, तर उत्सव म्हणून साजरा केला जातो. यादिवशी नाटफेडी म्हणून हौशेनवशे मोठ्या प्रमाणावर शौकाने जुगार खेळतात; पण येणाऱ्या आखाजीला जुगार खेळताना आढळून आल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे. कोरोनाचे संक्रमण व संचारबंदी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे हौशानवशांचा हिरमोड होणार असून, आखाजीच्या परंपरेवर कोरोनाचे सावट आले आहे.
पहूरसह परिसरात आखाजीला नाटफेडी व गंमत, तसेच शौक म्हणून जुगार खेळण्यासाठी विशेष मानले जाते. गल्लीबोळांसह परिसरात जुगार खेळणाऱ्यांचे ‘जथेच्या जथे’ आढळून येतात. काही ठिकाणी महिलावर्गही सहभागी होऊन याचा आनंद घेतात. शुक्रवार, दि. १४ रोजी आखाजीचा सण आहे. यासाठी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्याकडे परवानगी मागणाऱ्यांची धावाधाव सुरू आहे; पण कोरोनाचे संक्रमण, संचारबंदी लक्षात घेऊन खेळण्यास परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जर कोणी उल्लंघन करताना आढळल्यास थेट कडक कारवाई करून ‘ जेल’ची हवा खाण्यासाठी पाठविणार असल्याचे पहूर पोलिसांनी म्हटले आहे.
कारवाईचे अस्त्र
गेल्या महिन्यात पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या गावांमध्ये कारवाईचे अस्त्र उपसले असून धाडसत्र सुरू आहे. हातभट्टी उद्ध्वस्त करून ७ हजार ४०० लिटर रसायन नष्ट केले, तर तब्बल ८५ हजार १६६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला व सतरा जणांविरुद्ध कारवाई करीत अटक केली. तब्बल ४६ जुगारी व मटका खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत २० हजार ३८० ची रोकड जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे व बीट अंमलदार, सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड या कारवाईत सहभागी झाले होते.
आखाजीच्या सणाला गालबोट न लागता आपापल्या घरात, परिवारासोबत आनंदाने सण साजरा करा. प्रथा जरी जुगार खेळण्याची असली तरी वाईट प्रथा आहे. याचे सर्मथन करू शकत नाही. संचारबंदी व कोरोना संक्रमण लक्षात घेऊन कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे आढळल्यास त्याची गय करणार नाही. अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना असून, अवैध धंद्यांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे.
- राहुल खताळ, पोलीस निरीक्षक, पहूर पोलीस स्टेशन