विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:01 PM2019-09-02T13:01:05+5:302019-09-02T13:01:13+5:30

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या १६४ इच्छुकांनी रविवारी जळगावात ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री तथा भाजपचे निवडणूक निरीक्षक ...

 Bhagardi of aspirants to BJP for Assembly elections | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी

Next

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या १६४ इच्छुकांनी रविवारी जळगावात ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री तथा भाजपचे निवडणूक निरीक्षक मदन येरावार यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. या इच्छुकांमध्ये खासदार उन्मेष पाटील यांचा तालुका असलेल्या चाळीसगाव तालुक्यातून सर्वाधिक ३५ जण इच्छुक असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातूनही ८ जण इच्छुक आहेत तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातून एका जणाने निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे.
दरम्यान, जळगाव शहरातूनही २० जण सरसावले असून सध्या शिवसेनेकडे असलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातूनही भाजपच्या इच्छुकांनी तयारी दर्शविली आहे.
मदन येरावार यांच्या उपस्थितीत रविवारी एमआयडीसी परिसरातील बालाणी रिसॉर्ट येथे भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. दुपारी साडेतीन वाजेपासून येरावर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या.
या वेळी त्यांच्या सोबतच खासदार उन्मेष पाटील, भाजपचे विभाग संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपचे जिल्हाध़्यक्ष (ग्रामीण) डॉ. संजीव पाटील हे उपस्थित होते.
इच्छुकांची मोठी गर्दी
येरावार हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या गाठीभेटी घेणार असल्याने त्यासाठी शेकडो इच्छुकांनी तयारी केली व मोठ्या वाहनांच्या ताफ्यासह ते भेटीसाठी पोहचले. दुपारी साडेतीन वाजेपासून इच्छुकांच्या सुरू झालेल्या भेटीगाठी रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालल्या या सव्वा पाच तासांच्या गाठीभेटीत १६४ जणांनी निवडणूक निरीक्षकांची भेट घेत आपल्या जमेच्या बाजू व पक्षासाठी करीत असलेल्या कार्याची बायोडाटासह माहिती दिली. या वेळी भाजप इच्छुक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
खासदारांच्या तालुक्यातून सर्वाधिक इच्छुक
चाळीसगाव तालुक्यातून त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्यासह तब्बल ३५ इच्छुकांनी येरावर यांची भेट घेतली. जिल्ह्यातील इतर मतदारसंघापेक्षा सर्वाधिक ३५ इच्छुकांनी चाळीसगाव मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना उमेदवारी मिळावा यासाठी प्रयत्न होत असताना त्यांना स्पर्धक म्हणून बेळगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. संजीव पाटील, माजी खासदार ए.टी. पाटील यांचे साडू समाधान पाटील,जि.प.चे शिक्षण सभापती पोपट भोळे, प्रफुल्ल साळुंखे, डॉ.विनोद कोतकर यांच्यासह ३५जणांचा समावेश आहे.
पाचोऱ्यातून २४ तर अमळनेरातून २२ जण
चाळीसगावनंतर पाचोरा मतदार संघातून २४ तर अमळनेर मतदार संघातून २२ जण इच्छुक आहेत. यामध्ये अमळनेर तालुक्यातून आमदार स्मिता वाघ यांचा तर पाचोरा मतदार संघातून अस्मिता पाटील यांचा समावेश आहे. या शिवाय एरंडोल मतदार संघातून जि.प.चे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्यासह १० जण इच्छूक आहेत. रावेरमधून १४, चोपडा - १२, भुसावळ तालुक्यातून सहा जण इच्छूक आहेत.

मुक्ताईनगरातूनही सरसावले आठ जण
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातूनही आठ जण भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यात जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांचाही समावेश आहे.
जामनेर ‘राखीव’
रविवारी येरावार हे जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या भेटीगाठी घेणार होते. यामध्ये मात्र जामनेर मतदार संघ वगळण्यात आल्याची माहिती मिळाली. जामनेर मतदार संघातून इच्छुकांचा नंतर विचार केला जाईल, अशी तयारी असल्याचे सांगण्यात येत होते. तरीदेखील जामनेर तालुक्यातून एका जणाने भेट घेत भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली.
जळगाव ‘शहर’मधून २० जण इच्छुक
जळगाव शहर मतदार संघातून २० जण इच्छुक आहेत. यामध्ये जळगाव मनपाच्या नगरसेविकाच्या अ‍ॅड. शुचिता हाडा, डॉ. अनुज पाटील, सुनील खडके, प्रा. एस.एस. राणे, भाजपच्या व्यापार उद्योग आघाडीचे अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, डॉ. सुरेशसिंह सूर्यवंशी आदींचा समावेश आहे.
जळगाव ‘ग्रामीण’साठीही तयारी
जळगाव ग्रामीण मतदार संघ शिवसेनेकडे राहणार की भाजपकडे हे ठरण्याअगोदरच भाजपकडून इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. त्यासाठी रविवारी ग्रामीणसाठी इच्छुकदेखील आले होते. यामध्ये लकी टेलर, जि.प. सदस्य लालचंद पाटील, प्रभाकर सोनवणे, चंद्रशेखर अत्तरदे, कमलाकर रोटे यांच्यासह १४ जणांचा समावेश आहे. या वेळी जि.प.चे माजी सभापती पी.सी पाटील हे या वेळी उपस्थित होते, मात्र त्यांनी इच्छुक म्हणून नाव लिहिले नाही की भेट घेतली नाही, अशी माहिती मिळाली. .
 

Web Title:  Bhagardi of aspirants to BJP for Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.