भारतीय जीवनावर भागवत महापुराणचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 07:42 PM2018-09-21T19:42:11+5:302018-09-21T19:42:29+5:30
‘सिद्धांत व दृष्टांत’ या न्यायानुसार मानवाची जीवनगंगा वाहात असते. लहानपणापासूनच ‘सत्य वद’ हा धर्मशास्त्राचा सिद्धांत समजावून घेताना लाकुडतोड्याचा दृष्टांत पिढ्या न पिढ्या संक्रमीत झालेला हिंदू संस्कृतीत आपल्याला पाहायला मिळतो. असेच अनेक धर्ममूल्य नीतीमूल्ये मानवाला समजावून सांगणारा व पुराणांमध्ये ‘मुकुट मणी’ ठरलेला व श्रीमद् ही उच्च कोटीची पदवी प्राप्त केलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद् भागवत महापुराण होय.
भागवत महापुराण हे संस्कृत साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. पुराण वाङमयात लोकप्रियतेच्या दृष्टीने ते अद्वितीय आहे. गीतेनंतर एवढा सर्वमान्य ग्रंथ संस्कृत भाषेत झाला नाही. गेली कित्येक शतके भारतीय जीवनावर या पुराणाचा विलक्षण प्रभाव आहे. या ग्रंथात काव्य आहे. विविध कथा आहेत. आणि तत्त्वज्ञान सुद्धा आहे. बालकृष्णाच्या बाललिला आणि प्रौढ कृष्णाच्या पराक्रम कथा यात आहेत. योगेश्वर कृष्णाने उद्धवाला केलेला तत्त्वोपदेशही आहे. त्यात भक्तीची कर्म व ज्ञान यांच्याशी उत्तम सांगड घातलेली आहे. त्यात कर्माला हीन न मानता नरदेह हा भगवंताची सर्वोत्तम देणगी आहे. हे यात प्रतिपादन केलेले आहे. सध्याच्या काळात हा सिद्धांत प्रत्येक भारतीयाने आचरणात आणला तर आत्महत्येचा प्रश्नच उद्भवणार नाही! नाही का?
हा ग्रंथ फार मोलाचा आहे. पूर्वीच्या ग्रंथकारांनी सांगितलेल्या भक्तीपेक्षा नव्या प्रकारची भक्ती भागवत महापुराणात आली आहे. काही विचार न करता या ग्रंथात काहीही लिखाण केलेले आढळून येत नाही. उलट काही विचार तर अध्यात्म आणि भक्ती यांच्या क्षेत्रात अत्यंत उच्च आहेत. भागवतातील अशा विचारांचा अभ्यास केला की वाटते जिवंत धार्मिक अनुभवांचा तो आविष्कार आहे.
-दादा महाराज जोशी