६०० भाषांमध्ये झाले भागवत गीते भाषांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:52 PM2019-12-10T12:52:26+5:302019-12-10T12:52:42+5:30
जळगाव : गीतेचा जो विस्तार आहे त्याचेच नाव श्रीमद भागवत महापुराण आहे. अत्यंत संक्षिप्त भाषेत केवळ ७०० श्लोकांमध्ये ते ...
जळगाव : गीतेचा जो विस्तार आहे त्याचेच नाव श्रीमद भागवत महापुराण आहे. अत्यंत संक्षिप्त भाषेत केवळ ७०० श्लोकांमध्ये ते सामावले आहे. तब्बल ६०० भाषांमध्ये श्रीमद भागवत गितेचे भाषांतर झाले आहे़ गिता असा ग्रंथ आहे जो आपल्याला पुरूषार्थी, ज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, भक्तीनिष्ठ बनवितो असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले.
शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजित २१ दिवसीय श्रीमद भागवत कथा महोत्सवाच्या आठव्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते. या कथा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सलग आठ दिवस अनेक भाविक या कथेचे श्रवण करण्यासाठी दूरवरून सागर पार्क येथे येत आहेत. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की, खरबूज विळ्यावर पडले किंवा विळा खरबुजवर पडला तरी खरबुजच कापले जाणार आहे. संत महात्म्याशी संपर्क ठेवो अथवा संत महात्म्याच्या संपर्कात राहून कल्याण तर व्यक्तीचे होईल, असे ते म्हणाले.
आपण वारंवार या संसाराच्या जन्म मृत्यूच्या चकरात पडत असतो. कारण आपण खरोखर घरगृहस्थीमध्ये इतके अडकले आहोत की याशिवाय दुसरा काही संसार आहे याचा विचार करायला देखील वेळ मिळत नाही. काही लोक तर केवळ आपली पत्नी, मुले आणि बँक बॅलन्स इतकाच विचार करतात. अशी त्यांची बुध्दी मारली गेली आहे. संसारात आपला मृत्यू आणि येणारा काळ देखील ते पाहू शकत नाही, असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले.
भगवान जगन्नाथांच्या श्रीमुर्तीचे आगमन
श्रीमद भागवत कथा महोत्सवाप्रसंगी सोमवारी जगन्नाथपुरी येथून भगवान जगन्नाथांची श्रीमूर्ती घेवून पाच ब्राह्मणांचे आगमन झाले होते. यावेळी भगवान जगन्नाथांचे भव्य स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर भगवान जगन्नाथांच्या मूर्तीची स्थापना करून पुष्पवृष्टीने अभिषेक करण्यात आला.
सजीव आरासने वेधले विशेष लक्ष
श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा महोत्सवात आठव्या दिवशी एका सत्रात भगवान नारद आणि प्रतू तर दुसऱ्या सत्रात भगवान श्री नाथजी यांची सजीव आरास साकारण्यात आली होती.अत्यंत हुबेहूब साकारलेल्या आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.