‘फ्री वॉटर इंडिया मिशन’साठी चित्रपट सहदिग्दर्शकाची भारत भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 06:29 PM2018-07-04T18:29:47+5:302018-07-04T18:29:57+5:30
झारखंडचे रहिवासी श्रीराम डल्टन दररोज करताहेत २५ ते ३० किलोमीटर पायी प्रवास
अमळनेर, जि.जळगाव : जल, जंगल, जमिनीवर मानवाचा हक्क आहे, असे सांगत ‘फ्री वॉटर इंडिया मिशन’साठी तब्बल १०० किलोचा दगड सायकलवर लोटत झारखंडचे रहिवासी तथा चित्रपट सृष्टीतील सहदिग्दर्शक श्रीराम डाल्टन आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतभर पायी प्रवास करून जनजागृती करत आहेत.
जल, जंगल, जमीन हा आपला मूलभूत हक्क आह,े हे संविधानापुरते मर्यादित राहिले आहे, पाणी विकत घ्यावे लागत आहे, सर्वांना पाणी मोफत मिळावे यासाठी फ्री वॉटर इंडिया मिशनअंतर्गत चित्रपट सहदिग्दर्शक श्रीराम डाल्टन यांनी १५ मेपासून मुंबई येथून पदयात्रा काढली आहे. एका सायकलवर त्यांनी निसर्गाचे प्रतीक म्हणून १०० किलोचा दगड, एक रोपटे व पाण्याचे भांडे ठेवले असून, ते लोटत भारत भ्रमण करीत आहेत. दर दोन ते तीन कि.मी.वर रस्त्यात लोकांची गर्दी जमली की त्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करतात. त्यांच्यासोबत बिहारचे विभू वत्स, विनीत चौधरी झारखंड, शशिकांत कुमार झारखंड हेदेखील सहकार्य करीत आहेत.
मुंबई येथून निघाल्यानंतर विविध गावे करत सुमारे १००० कि.मी.चा प्रवास करत ते ५० व्या दिवशी अमळनेरात पोहचले. म.वा.मंडळाचे डॉ.अविनाश जोशी, रमेश पवार, संदीप घोरपडे, भारती गाला, नरेंद्र निकम, वसुंधरा लांडगे, जगदीश तावडे, भूमिका घोरपडे यांनी त्यांचे स्वागत केले.
नाशिक येथील नीलेश धीरे यांनी खास शिल्पकला करून १०० किलोच्या दगडावर जल, जंगल व पाण्याचे प्रतीक कोरण्यात आले आहे, तर रमेश अय्यर यांनी रोपटे आणि पाण्याचे भांडे दिले आहे. कडक उन्हाळ्यातही ते रोपटे जिवंत ठेवून अखेर त्यांना झारखंडपर्यंत न्यायचे आहे.
दररोज २५ ते ३० कि.मी.प्रवास करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश परत महाराष्ट्र, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड असा त्यांचा प्रवास राहणार आहे.