भटके विमुक्त हक्क परिषदेच्यावतीने जळगावात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:15 PM2018-09-30T12:15:51+5:302018-09-30T12:16:15+5:30
जळगाव : आपल्या विविध मागण्यासंदर्भात भटके विमुक्त हक्क परिषदेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी परिषदेच्यावतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, सामाजिक असुरक्षितता असलेला भटके विमुक्त हा समाज आजही आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत हक्कापासून वंचित आहे. त्यामुळे समाजाच्या विविध मागण्या असून त्या मान्य होत नाही. त्या मान्य करण्यात याव्या यासाठी आंदोलन छेडण्यात आले.
दादा ईदाते, घुमंतू-अर्ध-घुमंतू जनजाती आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, एससी-एसटीच्या धर्तीवर स्वतंत्र तिसरी सूची व कायमस्वरुपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा, अॅट्रासिटी कायदा लागू करावा, क्रिमीलियरची अट सरसकट रद्द करावी, शासकीय पातळीवर सर्वेक्षण करावे, सामाजिक पुनर्वसन करावे, राईनपाडा, बाभूळगाव येथील घटनांची पुरावृत्ती होऊ नये म्हणून सामाजिक सुरक्षेची हमी मिळावी या सह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या वेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे, पुरुषोत्तम काळे, वसंत गुंजाळ, साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर, अशोक गिरी महाराज, साहेबराव कुमावत आदी उपस्थित होते.