भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:29 PM2019-02-10T23:29:30+5:302019-02-10T23:31:18+5:30
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे जगासमोर उच्च कोटीचे तत्वज्ञान मांडले. या ग्रंथाचे अध्ययन कसे करावे, यावर ...
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे जगासमोर उच्च कोटीचे तत्वज्ञान मांडले. या ग्रंथाचे अध्ययन कसे करावे, यावर संत एकनाथ महाराजांनी आचारसंहिता सांगितली आहे.
भाव धरोनिय वाची ज्ञानेश्वरी ।कृपा करी हरी तयावरी ।। जर मनात भाव नसेल तर ज्ञानेश्वरी वाचू नये असे संत एकनाथ महाराजांना म्हणावयाचे आहे. मनात भाव असल्याशिवाय ज्ञानेश्वरीचा प्रभाव कसा जाणवेल? हरी कृपा कशी करेल? मनात भाव धरूनच ज्ञानेश्वरी वाचावी, मगच हरी त्या वाचणाऱ्यावर कृपा करेल. ज्ञानेश्वरीतील एक एक शब्द म्हणजे अमृताचे थेंब आहेत. या शब्दात सागराएवढा अर्थ भरला आहे. संत जनाबार्इंनी तर स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी। ज्ञान होय अज्ञानासी, ऐंसा वर या टिकेशी ।।
जर वाचायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचा आणि डोळ्यांनी पंढरी पहा. अज्ञानी माणसाला देखील ज्ञान प्राप्त होतं, जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर, कारण या ग्रंथाला असा वर आहे. परंतु सामान्य माणसांना हे पटणं अवघड जातं, कारण अशा प्रकारच्या ग्रंथसंपदा वाचता-वाचता संशय येतो आणि हा संशय श्रद्धेचा नाश करतो. त्यासाठी संत एकनाथ महाराजांनी सांगितले आहे.
एका जनार्दनी संशय सोडोनि । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ।।
श्रीकृष्णानीदेखील गीतेच्या चौथ्या अध्यायात संशयाबाबत सविस्तर वर्णन केले आहे आणि माऊलींनी तर अगदी सर्वांना समजेल असे दृष्टांतासकट यावर भाष्य केले आहे.
मनुष्य संशयात पडला की, नि:संशय नाश पावतो व तो ऐहिक सुखाना मुकतो. एकदा माणसाला संशयाने ग्रासले की, त्याला खरे-खोटे, चांगले-वाईट काहीच समजत नाही.
ज्याप्रमाणे जन्मांध पुरुष रात्र व दिवस ओळखत नाही. त्याप्रमाणे संशयात पडलेल्या मनुष्याच्या बुद्धीला दुसºयाचे सांगणे मुळीच पटत नाही. विज्ञानाने देखील आता मान्य केले आहे की, संशय हा एक आजारच आहे. आणि हा आजार फार मोठा भयानक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
म्हणूनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशांची वागुर । प्राणियांसी ।।
संशायाहून दुसरे अत्यंत घोर पातक नाही. संशय हे प्राण्याच्या सर्वनाश करणारे जाळे आहे.
भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना म्हणून, तू या संशयाचा त्याग कर. प्रथम संशयाला जिंक. हा संशय जेथे यथार्य ज्ञान नाही, तेथेच असतो. संशय श्रद्धाच बसू देत नाही. हा संशय वाढला की, तो बुद्धीलाही भ्रष्ट करतो.
ज्ञानोबांच्या या विवेचनावरून संशय किती भयानक असतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. संसारात असो, परमार्थात असो, आणि कोठेही असो याचा त्याग करणे गरजेचे आहे. नाहीतर हा संशय बुद्धी भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही.
सर्व शास्त्रात सांगितले आहे की, संशय नसावा तर चौकशी असावी. ज्याच्या मनात संशयाने प्रवेश केला त्याला काही बरे वाटत नाही आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे संशयासारखे मोठे पातक नाही; म्हणूनच संशयाचा त्याग करण्यासाठी भगवंताची कृपाच लागते.
- डॉ.कैलास पाटील, जळगाव