भवरलाल जैन अनंतात विलीन
By admin | Published: February 28, 2016 12:16 AM2016-02-28T00:16:02+5:302016-02-28T00:16:02+5:30
जैन हिल्स परिसर नि:शब्द : अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसागर
जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्यावर शनिवारी दुपारी ४.२१ वाजता जळगावमधील जैन हिल्सवर शासकीय इतमामात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ सुपुत्र अशोक जैन यांनी मुखाग्नी दिला. यावेळी त्यांचे पुत्र अनिल, अजित व अतुल जैन तसेच दलिचंद जैन व कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे देश-विदेशातील चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवून अंत्यसंस्काराच्या चौथर्यानजीक आणण्यात आले. यानंतर तीन फैर्या झाडून सलामी देण्यात आली. तसेच शहीद, देशभक्तांच्या निधनानंतर वाजविण्यात येणारी धून पोलीस दलातील कर्मचार्यांनी वाजविली. यावेळी जैन हिल्स परिसर नि:शब्द झाला होता.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, सेबीचे (सिक्युरिटी ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) माजी अध्यक्ष डी.आर.मेहता, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, अमरावती महसूल विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्यासह अर्थ, सामाजिक, राजकीय, उद्योग, व्यापार, शेती आदी क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. तसेच जिल्ह्यासह मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी ठिकाणचे शेतकरी, जैन यांचे चाहते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
रुग्णालय व जल व कृषि विद्यापीठ उभारणार व ५० गावांमध्ये शुद्धपाणीपुरवठा
भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ, त्यांची अपूर्ण राहीलेली इच्छा म्हणून जिल्ह्यात मुंबई, पुणेच्या धर्तीवर रुग्णालय उभारण्याची घोषणा भवरलाल जैन यांचे पुत्र अनिल जैन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केली. तसेच जिल्ह्यात वर्षभरात जन्मगाव वाकोदसह ५० गावांमध्ये पाणी शुध्दीकरण तंत्रज्ञान पोहोचविणार, जल व कृषि विद्यापीठ स्थापन करण्यासह प्रयोगशील शेतकर्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येईल, असेही अनिल जैन यांनी अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमात जाहीर केले.