पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे भैरवनाथांच्या पालखी मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 03:56 PM2019-02-05T15:56:03+5:302019-02-05T15:58:18+5:30
भैरवनाथांच्या पालखी मिरवणुकीने सावखेडा बुद्रूक, ता.पाचोरा येथे यात्रोत्सवाची सोमवारी रात्री सांगता झाली.
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : भैरवनाथांच्या पालखी मिरवणुकीने सावखेडा बुद्रूक, ता.पाचोरा येथे यात्रोत्सवाची सोमवारी रात्री सांगता झाली.
पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भैरवनाथ देवस्थान सावखेडा बुद्रूक येथे यात्रोत्सव साजरा करण्यात येतो व त्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी परंपरेनुसार परिसरातील सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द, वरखेडी बुद्रूक, भोकरी, वरखेडी खुर्द व लासुरे गावातून रोषणाई करून सजविलेल्या बैलगाडीतून भैरवनाथ महाराजांची वाजत-गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
स्वत: श्री भैरवनाथ महाराज आपल्या दाराशी आल्याचा दर्शन लाभ भाविक नतमस्तक होऊन घेतात. दारोदारी पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच पूजाअर्चा करून प्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला. ‘भैरवनाथ महाराज की जय’च्या जयघोषात रात्रभर हा पालखी सोहळा सुरू होता. सकाळी-सकाळी पालखी सोहळा भैरवनाथ देवस्थान याठिकाणी पोहचला व यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.
या पालखी सोहळा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.गजेंद्र पाटील व सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला.