‘भेंडी’ला फोडांचा आजार उत्पादक होताय बेजार! वातावरण बदलाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:42 PM2024-01-16T16:42:36+5:302024-01-16T16:42:51+5:30
उत्पादनानात घट येत आवक झाली कमी
कुंदन पाटील
जळगाव : वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील फोड येत असल्याने भेंडीच्या उत्पादनात मोठी घट निर्माण होत आहे. त्यामुळे उत्पादकांना भेंडी नकोशी वाटायला लागली आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात भेंडीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. ही भेंडी वाढ होतानाच वेडीवाकळी होत असल्याचे उत्पादकांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी तज्ज्ञांशी बोलून आवश्यक औषधांची फवारणीही केली. मात्र वाढ होत असलेल्या भेंडीवर फोड येत गेले. तोडणी केल्यानंतर ही फोडयुक्त भेंडीचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर उत्पादकांनी भेंडीची छाटणी करुन बाजारात न्यायला सुरुवात केली आहे. लागवड, पोषण, औषध फवारणी आणि तोडणीचा खर्च अवाक्याबाहेर जात असतानाच आता भेंडी छाटणीचा भार अंगावर आला आहे. त्यामुळे उत्पादक मोठ्या कोंडीत सापडला आहे.
आवक घसरली
बाजारात भेंडीची आवक मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. फोडयुक्त भेंडीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात येणाऱ्या चांगल्या दर्जाची भेंडी आता ८० रुपये प्रतिकिलोचा भाव घेऊन बसली आहे.
यंदा ‘फोड्या’ची भेंडीवर मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. पर्यायी औषधी फवारल्यावरही उपयोग झालेला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना पर्यायही सापडत नसल्याने यंदा भेंडीने आर्थिक गणित बिघडविले आहे.
-संदीप माळी,उत्पादक मोरफळ (पारोळा)
वातावरणात कमालीचा बदत होत आहे. त्यामुळे भेंडींची वेडीवाकडी वाढ होणे, वाढ खुटणे, फोड येणे, डाग पडणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. या उपायायेजना म्हणून संशोधकांच्या मदतीनेच पर्याय शोधावा.
-डॉ.व्ही.टी.पाटील, वरिष्ठ भाजीपाला पैदासकार, म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.