दीपनगरात भीम आर्मीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 09:20 PM2021-01-06T21:20:10+5:302021-01-06T21:20:16+5:30
दीपनगरात भीम आर्मीने आंदोलन केले.
भुसावळ : वीजनिर्मितीच्या फेकरी येथील २१० मेगावॉट प्रकल्पाच्या गेटसमोर भीम आर्मीतर्फे मंगळवारी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कामगारांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे पूर्ण वेतन द्यावे यासह दोन ठेकेदारांकडे सुरू असलेली नियमाबाह्य कामे थांबवावी यासाठी भीम आर्मीतर्फे फेकरी गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली.
कोरोनाच्या काळात कंत्राटी कामगारांना १३ दिवसांचा पगार देण्यात आला. मागण्यांसंदर्भात दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे भीम आर्मीतर्फे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र याबाबत ठेकेदाराने कामगारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, महाराष्ट्र प्रवक्ता रमाकांत तायडे, जिल्हा महासचिव श्रीकांत वानखेडे, जिल्हा संघटक विक्रम प्रधान, तालुकाध्यक्ष विजय मालविया, तालुका उपाध्यक्ष विजय वानखेडे, राजू इंगळे, कामगार शाखाध्यक्ष कुलदीप वानखेडे, सागर सावळे, प्रदीप मोरे, मंगल गायकवाड, रोहिदास शिंदे, समाधान सपकाळ, अनिल भारंबे, अरविंद मेघे, निंबाजी लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.