अंतुर्ली येथे जलक्रांतीतर्फे महाश्रमदानातून भामदरा नाल्याचे खोलीकरण तर मानमोडी नाल्यावर बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:18 PM2019-06-07T16:18:49+5:302019-06-07T16:20:56+5:30
अंतुर्ली येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जलक्रांती अभियान ग्रामस्थांतर्फे महाश्रमदान करण्यात आले. भामदरा नाल्याचे खोलीकरण, तर मानमोडी नाल्यावर बंधारा बांधण्यात आला.
अंतुर्ली/मुक्ताईनगर, जि.जळगाव : अंतुर्ली येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जलक्रांती अभियान ग्रामस्थांतर्फे महाश्रमदान करण्यात आले. भामदरा नाल्याचे खोलीकरण, तर मानमोडी नाल्यावर बंधारा बांधण्यात आला.
या महाश्रमदान कार्यक्रमाच्या ठिकाणी गावासह परिसरातील जवळपास ३०० जणांनी आपला सहभाग नोंदविला. अंतुर्ली हा परिसर तापी काठावर आहे. असे असल्यावरसुद्धा यावर्षी परिसरात दरवर्षीच्या तुलनेत पाण्याच्या पातळी खालावली आहे. यामुळे भविष्यात जलसंकट निवारण करण्यासाठी ग्रामस्थांनी या कार्यास सुरवात केली. गावात आणखी वेगवेगळ्या पद्धतीने पाणी अडवणे तसेच जिरवण्यासाठी विविध पर्याय निवडण्यात येतील. तसेच गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा मानसही जलक्रांती अभियान तसेच समस्त ग्रामस्थांचा आहे. ग्रामस्थांनी या कायात उस्त्फूर्त सहभाग नोंदविला.
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या अत्यल्प वृष्टीमुळे भूगर्भातील पाणी व तापी नदी आणि इतर जलाशय हे घटले आहेत. पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या मुद्यावर संपूर्ण अंतुर्ली ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक एकत्रित येऊन आपल्या परिसरातील पाण्याची उपलब्धता कशाप्रकारे वाढेल याचा विचार करत हे श्रमदान शिबिर राबवण्यात आले.
या नाल्याचे खोलीकरण करून पाणी अडवण्याचे कामही श्रमदानातून हाती घेण्यात आले आहे. यासाठी गावकरी, शेतकरी, वेगवेगळ्या संघटनांनी पुढाकार घेऊन नाल्याचे खोलीकरण व बंधाºयाचे काम हाती घेऊन कामाला सुरवात केली. यात नरेंद्र दुट्टे, दिनकर पाटील, डी.आर.महाजन, कैलास दुट्टे, सुनील तराळ, मोहन बेलदार, मोहन बारी, श्रीकांत पाटणकर, विलास दुट्टे, दत्तू पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांनी श्रमदान केले.