पहूर येथे मंगलपोत चोरणाऱ्याचे भिवंडी-मुंबई कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 03:57 PM2021-02-02T15:57:06+5:302021-02-02T15:59:14+5:30
पहूर बसस्थानक परिसरात मंगलपोत चोरणाऱ्या भिवंडी येथील ५० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर ता जामनेर : पहूर बसस्थानक परिसरात मंगलपोत चोरणाऱ्या भिवंडी येथील ५० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने महिला सापडली तर सोबत असलेल्या तीन ते चार महिलांनी पळ काढल्याचे सांगितले जात असून वारंवार मंगलपोत चोरीच्या घटनांचे भिवंडी- मुंबई कनेक्शन समोर आले आहे.
गोंदेगाव, ता. जामनेर येथील रहिवासी रूखमाबाई नारायण जेठे ही जामनेर येथे जाण्यासाठी पहूर बसस्थानकातून पाचोरा शेवगाव बसमध्ये चढत असताना सुमन प्रताप लोंढे (५०) या महिलेने मंगलपोत चतुराईने काढली. पण त्या महिलेच्या प्रकार लक्षात येताच आरडाओरड झाली व बंदोबस्तला असणारे वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाळ गायकवाड यांनी संशयित महिलेला गर्दीतून पकडले. यादरम्यान महिलेसोबत असलेल्या तीन ते चार महिलांनी पळ काढल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून भरणाऱ्या आठवडे बाजारात व बसमध्ये चढताना अनेक महिलांच्या मंगलपोत चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्या उघडकीस आल्या नाहीत.
पोलीस या घटनांचा तपास करत आहे. या घटनेने मंगलपोत चोरणारी भिवंडी-मुंबई टोळी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रूखमाबाई जेठे यांच्या फिर्यादीवरून सुमन प्रताप लोंढे महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. जामनेर न्यायालयाने महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रवास करीत असताना प्रवासी व नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद वावरणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलीसांना देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी केले आहे.