पगारवाढीचा परस्पर ठराव करणे भोवले, जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना प्रवेशद्वारावरच रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:25 PM2020-02-05T12:25:40+5:302020-02-05T12:27:21+5:30
‘रिलिव्ह लेटर’ घेण्यास नकार देत गेले सुट्टीवर, लेखा व्यवस्थापक के.बी. पाटील प्रभारी एमडी
जळगाव : स्वत:चा पगार स्वत:च गुपचूप वाढवून घेत इतिवृत्तात नोंद करणारे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) संजीवकुमार गौतम यांनी मंगळवारी पदमुक्त करण्याचे पत्र (रिलिव्ह लेटर) घेण्यास नकार देत सुट्टी टाकून निघून गेले. तत्पूर्वी त्यांना दूध संघाच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. त्या नंतर त्यांनी वाहन दूध संघात लावले व निघून गेले. दरम्यान, कार्यकारी संचालक पदाचा (एमडी) प्रभारी पदभार संघाचे लेखा व्यवस्थापक के.बी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) संजीवकुमार गौतम यांनी स्वत:चा पगार स्वत:च गुपचूप वाढवून घेऊन तो विषय बैठकीच्या इतिवृत्तात परस्पर घुसविल्याचे इतिवृत्त मंजुरीपूर्वी संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे या बाबत गौतम यांना या बाबत सूचना देत पगारवाढीस नकार दिला होता व १ फेबु्रवारी रोजीच त्यांचा राजीनामा घेण्यात आला. सोमवार, ३ फेबु्रवारी रोजी त्यांना पदमुक्त करण्यात येणार होते. मात्र गौतम हे दूध संघात आलेच नाही, असे खडसे यांनी सांगितले.
९० हजाराने वाढविला पगार
गौतम यांनी इतिवृत्तात नोंद करताना ९० हजार रुपये पगार वाढीची नोंद केली होती. मात्र गौतम यांच्या मुलाखतीवेळी पगार ठरविला व तसे नियुक्ती पत्र दिले होते. त्यामुळे मध्येच पगार वाढ देणे शक्य नाही, असे खडसे यांचे म्हणणे आहे.
प्रवेशद्वारावरच रोखले
मंगळवारी गौतम हे दूध संघात आले असताना त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात येऊन प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. मात्र त्यांचेकडे असलेले वाहन त्यांनी दूध संघात लावले व ते निघून गेले.
पत्र घेण्यास नकार, लेखा व्यवस्थापकांकडे पदभार
मंगळवारी गौतम यांना दूध संघातर्फे पदमुक्त करण्यात येणार होते. यात त्यांना पदमुक्तीचे पत्र देण्यात आले, मात्र त्यांनी ते घेण्यास नकार दिला व सुट्टी टाकून निघून गेल्याची माहिती मंदाकिनी खडसे यांनी दिला. पदमुक्तीचे पत्र गौतम यांनी घेतले नसले तरी दूध संघाने त्यांना एकतर्फी पदभार काढून घेत संघाचे लेखा व्यवस्थापक के.बी. पाटील यांच्याकडे पदभार सोपविला.
पगारवाढीची इतिवृत्तात नोंद करताना गौतम यांनी अध्यक्षांची परवानगी घेतलेली नव्हती. केवळ दोन ते तीन संचालकांशी चर्चा केली होती व त्यांनी त्यास अनुमतीही दर्शविली होती, असेही मंदाकिनी खडसे यांचे म्हणणे आहे.
राजकीय दबावातून आपल्याकडून राजीनामा घेण्यात आला आहे. या बाबत कोणत्याही प्रकारची नोटीस न देता राजकीय दबावातून राजीनामा घेतला.
- संजीवकुमार गौतम, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघ
संजीवकुमार गौतम यांनी परस्पर स्वत:च्या पगार वाढीचा ठराव इतिवृत्तात नोंद केला होता. तसे करणे चुकीचे असून त्यांना पुन्हा संधी देणेही चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. राजकीय आरोपाबाबत त्यांना कोणी सांगितले असेल म्हणून ते तसे बोलत असतील.
- मंदिकीनी खडसे, अध्यक्षा, जिल्हा दूध संघ