अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने दाम्पत्याला लावला ११ लाखांचा चूना, ६ जणांची फसवणूक
By सुनील पाटील | Published: October 4, 2022 05:30 PM2022-10-04T17:30:15+5:302022-10-04T17:31:34+5:30
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे.
जळगाव - आपल्या अंगात दैवी शक्ती आहे. तुमच्या घरात सुखशांती नांदावी, घरातील व्यक्तीने केलेल्या आत्महत्येमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळवून देण्यासाठी होमहवन यासह इतर कारणं व अघोरी शक्तीची भीती घालून पल्लवी नितीन पाटील (वय ३८,रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) यांना ललीत हिमंतराव पाटील व त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील (रा.मेरा घर, सावखेडा शिवार, पिंप्राळा) या भोंदू दाम्पत्याने तब्बल ११ लाख ३२ हजार रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांविरुध्द मंगळवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे. भारत धोंडू सैंदाणे (रा.चोपडा), संदीप चव्हाण (रा.चाळीसगाव), हर्षल जोशी (रा.महाबळ, जळगाव), अरविंद पाटील (रा.गणेश कॉलनी, जळगाव), महेश वाघ (रा.खेडी रोड, जळगाव) व ताराचंद पवार (रा.सावखेडा शिवार) यांनाही लुटले असून यातील एका जणाकडून तब्बल ३५ लाख रुपये घेण्यात आल्याचे अनिसच्या विभाग राज्यकार्यकारिणी सदस्य नंदीनी जाधव यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. या भोंदू दाम्पत्याविरुध्द फसवणूक, महाराष्ट्र नरबळी,जादूटोणा, इतर अमानुष व अघोरी प्रथाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महिमा ही मुंबई पोलीस दलात कार्यरत होती