जळगावच्या ‘त्या’ भोंदूबाबाला अटक, मित्रानेच फोडले बिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:15 AM2022-01-25T08:15:39+5:302022-01-25T08:16:03+5:30
करणी, कॅन्सर उपचाराच्या नावाखाली गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली ३२ लाख १५ हजार ८७५ रुपयांची फसवणूक करणाऱ्या पवन बापुराव पाटील (२८) या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी रविवारी डोंबिवलीतच अटक केली. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराला करणी काढण्याबरोबरच कॅन्सर उपचाराच्या नावाखाली गंडा घातला गेला आहे.
तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागेल, असे सांगून पवनने कळवा येथे राहणाऱ्या प्रियंका राणेसह डोंबिवलीतील तिच्या आईच्या बँक खात्यातून ३१ लाख सहा हजार ८७४ रुपये वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर करवून घेतले होते. त्याचबरोबर एक लाख नऊ हजार रुपये किमतीच्या भेटवस्तूही त्याने घेतल्या. दरम्यान, फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच प्रियंकाने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मात्र, याची खबर पवनला लागू न देता प्रियंकाने त्याला डोंबिवलीत बोलावून घेतले आणि तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पवन हा अविवाहित असून, तो त्याच्या जळगावातील आपल्या गावी दरबार भरवायचा अशीही माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश सरडे यांचे पथक जळगावला रवाना झाले आहे.
आजार बरा करतो
प्रियंकाच्या वडिलांना कॅन्सर होता. मला दैवी शक्ती प्राप्त आहे. त्यामुळे माझ्या उपचाराने तुमचे वडील कॅन्सरमुक्त होतील असे सांगून पवनने उपचारासाठी काही पैसे घेतले. परंतु, वडील त्या आजारातून बरे झाले नाही, त्यात त्यांचा मृत्यू झाला. कोणी तरी तुमच्या वर करणी केली आहे हे सांगून त्याने प्रियंकाचा विश्वास संपादन करून तिच्याकडून पुन्हा पैसे घेतले. त्याने या कुटुंबीयांकडून जवळपास ३२ लाख रुपये उकळले आहेत.
मित्रानेच फोडले बिंग
पवनच्या मित्रानेच त्याचे बिंग फोडत प्रियंकाला त्याच्या बनवेगिरीची माहिती दिली. त्याचबरोबर कोपरखैरणे येथील एका महिलेकडूनही तिला सर्वकाही सांगण्यात आले. तेव्हा प्रियंकाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.