बहादरपूर येथे वानप्रस्थाश्रम बांधकामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:10 PM2020-01-28T17:10:54+5:302020-01-28T17:12:44+5:30
बहादरपूर येथे ‘बद्रीनाथ वानप्रस्थाश्रमा’चे भूमिपूजन प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील बहादरपूर येथे रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांच्या भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेद्वारे ‘बद्रीनाथ वानप्रस्थाश्रमा’चे भूमिपूजन २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पार पडले. बहादरपूर येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत मालकीची जागा उपलब्ध करून दिली व त्यासाठी बहादरपूरचे ग्रामविकास अधिकारी यांनी सहकार्य केले.
वय वर्षे पन्नासपर्यंत माणसास बऱ्याच अंशी आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून मोकळीक मिळालेली असते व त्यानंतरचा काळात वानप्रस्थाश्रम अवस्थेत आपल्या वैयक्तिक आवडी-निवडी, अध्यात्मिक उन्नती, वैचारिक उन्नती व सामाजिक कार्य यासाठी जीवन व्यतीत करणे अपेक्षित आहे. परंतु तशी परिस्थिती व व्यवस्थेचा अभाव असल्याने शेवटपर्यंत पारिवारिक चक्रातच मनुष्य व्यस्त राहतो. भारतात वानप्रस्थाची व्यवस्था हरिद्वार, काशी अशाच ठिकाणी पाहायला मिळते.
असे असेल वानप्रस्थाश्रमाचे स्वरूप
भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेने बहादरपूर येथे भव्य वानप्रस्थाश्रम उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्यात योग-प्राणायाम, ध्यान-धारणा, निसर्गोपचार, वाचनालय, विविध खेळ -विरंगुळा तसेच आपल्या सुप्त गुणांना वाव देण्याची व्यवस्था असेल. महत्वाचे म्हणजे यात येणारे कायमस्वरूपी वास्तव्यास राहणार नसतील प्रति वर्ष ३० दिवसांचे नियोजन असेल. एक व्यक्ती वर्षातून तीन वेळेस १०-१०-१० दिवसांसाठी किंवा दोन वेळेस १५-१५ दिवसांसाठी येऊ शकेल. तसेच काहींना याशिवाय काही प्रमाणात कालावधी वाढवून पाहिजे असल्यास त्यावरही विचार करण्यात येईल, अशी ही योजना आहे.
नियोजित बद्रीनाथ वानप्रस्थाश्रमचे भूमिपूजन नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते झाले व फलकाचे अनावरण सरपंच चंद्रकांत जावरे, माजी सरपंच निंबा चौधरी, मिलिंद मोरे , उपसरपंच योगिता लोकाक्षी ग्रा.पं. सदस्य संगीता वाणी, ज्ञानेश्वर वाघ, शोभा चौधरी ग्रामविकास अधिकारी देशमुख यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमात पारोळा पं.स. उपसभापती अशोक नगराज पाटील, अॅड. ए. आर बागुल, यु.एच.करोडपती, प्रा.व्ही.एन कोळी, एन.एस.ठाकरे, पंढरीनाथ वाणी, नंदकुमार वाणी, चंपालाल पाटील, संजय पाटील, हरेकृष्ण पाटील, विजय पाटील, रावसाहेब भोसले, अभय पाटील, योगेश चौधरी, दीपक भावसार, संस्थेचे विश्वस्थ भगवान अमृतकर, विनोद सोनार, हेमराज राणे, पी.एस.बागुल, डी.डी.विसपुते, बी.एस.भावसार, एच. आर. पाटील, जे. पी. बाविस्कर , आर. पी. बडगुजर, अमोल चौधरी व भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.