भूतदया...सोनाळे येथील मृत वानराचे ग्रामस्थांनी केले उत्तरकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 05:29 PM2017-12-19T17:29:18+5:302017-12-19T17:34:56+5:30
वानराच्या मृत्यूचा दुखवटा म्हणून पाच युवकांनी केले केशदान
आॅनलाईन लोकमत
पाळधी ता. जामनेर,दि.१९ : सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुक्या प्राण्यावरील होणारे हल्ले आणि अमानुष छळाच्या घटना व्हायरल होत असताना जामनेर तालुक्यातील सोनाळे येथील ग्रामस्थांनी मृत वानराचे एखाद्या मृत व्यक्तीप्रमाणे उत्तरकार्य करीत भूतदया जोपासली आहे. या वानराच्या मृत्यूचे दु:ख म्हणून गावातील पाच तरुणांनी केशदान देखील केले आहे.
जामनेर तालुक्यातील सोनाळे येथे एक वानर झाडावर उड्या मारत असताना त्याचा तोल गेला. ते वानर जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले. त्यानंतर कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करीत ठार केले. ही घटना गावातील नागरीकांना समजली. त्यांनी माकडाचा मनुष्याप्रमाणे अंत्यविधी केला. दहाव्या दिवशी दशक्रिया विधी करीत सचिन पाटील, समाधान पाटील, शांताराम पाटील, सागर पाटील, अतुल पाटील या युवकांनी केशदान केले. पंढरी पाटील, राजु पाटील, बबलू पाटील, स्वप्निल चौधरी, नीलेश पाटील, बाळू पाटील, सुभाष पाटील यांनी उत्तरकार्यात सहभाग नोंदविला.
तेराव्या दिवशी माकडाच्या गंधमुक्तीचा कार्यक्रम केला. सकाळी ५०० ते ६०० लोकांना वरण, पोळी, भात, भाजी असा अन्नदानाचा कार्यक्रम केला. रात्री ह. भ. प.बाळकृष्ण महाराज वाकोदकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. युवकांच्या या भूतदयेबाबत सरपंच, उपसरपंच तसेच सोनाळे पंचक्रोशीतील वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले.