भुसावळ तालुक्यातील वरणगाव पालिका सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:51 PM2018-12-15T21:51:14+5:302018-12-15T21:51:52+5:30
वरणगाव, ता. भुसावळ , जि.जळगाव : नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पालिकेची विशेष सभा झाली. त्यात नगरसेवकांनी प्रश्नांचा ...
वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पालिकेची विशेष सभा झाली. त्यात नगरसेवकांनी प्रश्नांचा भडीमार करून बांधकाम अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यास धारेवर धरले.
गेल्या १० डिसेंबर रोजी झालेल्या सभेत कामाच्या निविदा न उघडताच त्यातील निविदांना चर्चेविना सभागृहाने बहुमताने मान्यता दिली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे निविदा उघडल्या गेल्या नसल्याची माहिती नगरसेवकांच्या एका गटास मिळाल्याने त्यांनी याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती. पालिका प्रशासनाने सावरासावर करीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
पालिका प्रशासनाने निविदा उघडली की नाही? याबाबत सर्व सदस्यांना अंधारात ठेवून सभेच्या पटलावर निविदेचे विषय मांडून बहुमताने मंजूर करून घेतले होते, ही बाब उघड झाल्याने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवल्याने सभेत नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आजच्या २३ विषयांपैकी आठ विषयांना सभेने मंजुरी तर निविदेच्या बाकी विषयावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे गटाने उच्च न्यायालयात धाव घेत, निविदा मंजुरीच्या विषयावर स्थगिती मिळविल्याने ते विषय सभेत चर्चेला घेतले गेले नाही. सभेस सर्व नगरसेवक उपस्थित होते.
विकास कामांच्या निविदांवर विरोधकांनी उच्च न्यायालयात स्थगिती मिळविल्याने शहरातील तीन कोटींच्या कामाला खीळ बसली. शहराचा विकास थांबविण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहे. याचे दु:ख होते.
-सुनील काळे, नगराध्यक्ष, वरणगाव
आमचा विकासाला आळा नाही. परंतु पालिका प्रशासनाने नगरसेवकांना अंधारात ठेवून निविदा न उघडता मंजुरी घेतल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली.
-नितीन माळी, नगरसेवक, न.पा., वरणगाव