भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:37 AM2018-10-31T01:37:45+5:302018-10-31T01:39:25+5:30
भुसावळ येथील पंधरा बंगला भागातील रेल्वे हद्दीतील ब्रिटीश काळापासून असलेली अतिक्रमणे मंगळवारी तगडा पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.
भुसावळ : रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील सर्वच ठिकाणचे अतिक्रमण काढले असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भुसावळ येथील पंधरा बंगला परिसरातील अतिक्रमित १९० घरे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण हटाव करण्यासाठी अनेक बैठका झाल्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने बंदोबस्त निश्चित होताच मंगळवारी सकाळी ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले.
अनेक वेळा प्रलंबित झालेला पंधरा बंगला परिसरातील अतिक्रमणांचा विषय कधी कमी पोलीस प्रशासनाच्या बलामुळे तर कधी सणासुदीच्या विषयामुळे वारंवार प्रलंबित होत गेला.
अनेक वेळा तयारी करून सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त मिळू शकला नाही, यामुळे तारखांवर तारखा पडून अतिक्रमण हटावचा मुद्दे पुढे जात राहिला. शेवटी मंगळवारी रेल्वे प्रशासनाने प्रचंड प्रमाणात बंदोबस्त लावून १९० अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त केली. यासाठी सकाळी ६:३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चार जेसीबी व चार ट्रॅक्टरसह १२० पोलीस कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बलाचे ८२ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीईएन तोमर, सेक्शन इंजिनियर मीना, डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार संजय तायडे, रेल्वे सुरक्षा बलाचे यार्डाचे निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील व कर्मचाऱ्यांनी स्वत: हजर राहून बंदोबस्तात अतिक्रमित घरे व काही धार्मिक स्थळे जमीनदोस्त केले.
ब्रिटिशकालीन घरे उद्ध्वस्त केल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर
रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार सूचना व नोटीसा बजावल्या होत्या. अनेकांनी स्थलांतर केले परंतु ज्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता ते घरामध्ये होते. प्रशासनाचा मोठा फौजफाटा बघून आता काहीच पर्याय उरला नाही, घर सोडावेच लागेल, या जाणिवेमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. या घरामध्ये संबंधितांच्या तिसºया पिढ्यांचा निवास होता . अनेकांच्या येथे भावना जुळलेल्या होत्या. यामुळे मन हेलावणारे दृश्य याप्रसंगी दिसून आले .