बीएचआर: सुनील झंवरला १० दिवस कोठडी; तपासात ७२ कोटीचा अपहार उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 10:33 PM2021-08-11T22:33:03+5:302021-08-11T22:33:54+5:30
बीएचआर प्रकरणात आतापर्यंत अवसायक जितेंद्र कंडारे, कर्जदार व इतर अशा १९ जणांना अटक झालेली आहे.
जळगाव : बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात अटक केलेला मास्टरमाईंड सुनील देवकीनंदन झंवर (वय ५९,रा.जय नगर, जळगाव) याला पुणे विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मंगळवारी सकाळी नाशिक येथून अटक केली.
बीएचआर प्रकरणात आतापर्यंत अवसायक जितेंद्र कंडारे, कर्जदार व इतर अशा १९ जणांना अटक झालेली आहे. आमदार चंदूलाल पटेल, योगेश किशोर साखला,योगेश रामचंद्र लढ्ढा, माहेश्वरी यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. कृणाल कांतीलाल शहा (रा.अहमदाबाद), रमेश रुपचंद जैन (रा.स्वातंत्र्य चौक, जळगाव) व उदयकुमार गौतमचंद कांकरीया (रा.शिवरामनगर) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वीच फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आतापर्यंत ७२ कोटी ५६ लाख २१ हजार १५६ रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. दागिने व रोख रक्कम मिळून ३० लाख ५ हजार ४३६ रुपयांचा ऐवज आतापर्यंत घरझडतीत मिळून आलेली आहे.
दरम्यान, पतसंस्थेने पुण्यात २१ कोटी ३० लाखात खरेदी केलेल्या तीन मालमत्ता सुनील झंवर याने त्याच्या संस्था व त्याच्या सालासर कंपनीतील पूर्वाश्रमीचा भागीदार योगेश लढ्ढा याच्या नावाने अवघ्या ५ कोटी ७२ लाख ४४ हजार २२१ रुपयात खरेदी केल्याचेही उघड झाले आहे. त्यातही ४ कोटी २ लाख ३८ हजार ९१ रुपयांच्या ठेव पावत्या बेकायदेशीरपणे वर्ग केलेल्या आहेत.
का हवी झंवरची पोलीस कोठडी
सुनील झंवर हा आठ महिने फरार होता. त्या काळात तो दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशसह इतर ठिकाणी वास्तव्यास होता, त्यामुळे त्याने काही इलेक्ट्रॉनिक्स पुरावे नष्ट केले किंवा लपवून ठेवले असावेत त्याचा तपास करणे, या कालावधीत तो कोणाच्या संपर्कात होता.तपासासाठी त्याला जळगाव येथे न्यायचे आहे. पिता-पूत्राच्या नावाने असलेल्या फर्मच्या नावे मालमत्ता विकत घेतल्या असून त्यासाठी झंवरनेच पैसा पुरविला आहे. कोणाच्या सांगण्यावरुन व कोणासाठी या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत यासह कर्ज निरंक दाखले देखील या हार्डडिस्कमध्ये मिळून आल्याने ते कसे आले याची चौकशी केली जाणार आहे.