बीएचआर घोटाळा, दोन संशयित महिलांची कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 10:43 PM2021-06-17T22:43:20+5:302021-06-17T22:45:14+5:30
बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज राज्यभर अटकसत्र राबून तब्बल १२ संशयित आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज राज्यभर अटकसत्र राबून तब्बल १२ संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन संशयित महिला आरोपींची धरणगाव पोलीस स्थानकात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यभर अटकसत्र राबविले. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज दुपारपर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई) या संशयितांचा समावेश आहे.
दरम्यान, अटक केलेल्या बहुतांश आरोपींच्या घराची पथकाने झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे अटकेत असलेल्या जयश्री अंतिम तोतला आणि जयश्री मणियार या दोन महिला संशयित आरोपींची पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकातील महिला अधिकारी मागील काही तासांपासून कसून चौकशी करत असल्याचे कळते. चौकशीत संशयित आरोपींनी नेमकी काय माहिती दिली अद्याप समजू शकलेले नाही.