नशिराबादला आज सहा कोटींच्या कामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:27+5:302021-07-19T04:12:27+5:30
नशिराबाद : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दोनच्या अत्याधुनिक सुसज्ज सुविधांसह इमारती उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून मंजूर ...
नशिराबाद : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दोनच्या अत्याधुनिक सुसज्ज सुविधांसह इमारती उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून मंजूर झालेल्या सहा कोटी रुपयांच्या इमारतीचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज १९ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता आरोग्य केंद्राच्या आवारात होत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नशिराबाद येथे आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारत उभारणीसाठी निधी मंजूर झाला आहे. गावाचा वाढता विस्तार व लोकसंख्या लक्षात घेऊन गावात सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय निर्मिती व्हावी अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. गावाचा विस्तार दिवसेंदिवस नवनवीन वस्तींमध्ये वाढत आहे. त्यामुळे मुक्तेश्वर नगर परिसरात आरोग्य उपकेंद्र दोनची सर्व सुविधायुक्त इमारत उभारणी करण्यात येत आहे. भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील आहेत, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील,रक्षा खडसे,आमदार सुरेश भोळे, पंचायत समिती माजी सभापती यमुनाताई रोटे,पंचायत समिती सदस्या जागृती चौधरी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.