भुसावळचा नवरदेव लग्नाआधीच गायब झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 07:38 PM2018-04-24T19:38:49+5:302018-04-24T19:38:49+5:30
नाशिक पोलिसात नोंद : पत्रिका वाटायला गेला अन् गायब झाला
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२४ : नाशिक येथे स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला गेलेला भुसावळ येथील नवरदेव बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. समाधान भास्कर बुगले (वय २८, रा.खडका, भुसावळ) असे या नवरदेवाचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक येथील भद्रकाली पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद झाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ येथील खडका परिसरात राहणारा समाधान याचे २८ एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. नाशिक शहरातील राजीवनगरात राहणाऱ्या आतेबहिणीस लग्नाची पत्रिका देण्यासाठी १८ एप्रिल रोजी गेला होता. धुळे शहरातील चाळीसगाव फाटा येथून धुळे-नाशिक बायपास बसने तो द्वारकानगरात उतरला. तत्पूर्वी त्याने या बहिणीला फोन करून माहिती दिली होती. मात्र नंतर त्याचा संपर्कच झाला नाही. त्याच्याकडे असलेले दोन्ही मोबाइल क्रमांक बंद होते.
अवघ्या काही दिवसांवर लग्न सोहळा येऊन ठेपल्याने नातेवाइकांनी त्याची शोधाशोध केली. तपास न लागल्याने शेवटी आतेबहीण मनीषा श्रीराम महाजन (वय ३८, रा. राजीवनगर, नाशिक) यांनी नाशिक भद्रकाली पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. अजूनही त्याचा शोध लागला नाही.
समाधान हा ‘महावितरण’मध्ये नोकरीला आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना नवरदेव गायब झाल्याने नवरदेव व नवरीकडील नातेवाईक मंडळी चिंतेत आहेत.पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचे काही दिवसांपूर्वीचे लोकेशन चाळीसगाव आले होते. मात्र मोबाइलच बंद असल्याने चिंता वाढली आहे, दुसरीकडे लग्नाची सर्व तयारी झालेली आहे.