भुसावळ-जळगाव चौथ्या रेल्वे मार्गाचे काम ७० टक्के पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:03 AM2022-03-22T10:03:32+5:302022-03-22T10:04:21+5:30
Bhusawal-Jalgaon railway line : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे, रस्ते व शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प लोकसभा निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्याचे ठरविले आहे.
जळगाव : गेल्या वर्षी जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर, भुसावळरेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भुसावळ दरम्यान पुन्हा चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२२ पर्यंत या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या निर्माण विभागातर्फे देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे, रस्ते व शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प लोकसभा निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रात असे एक लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आहेत. यामध्ये भुसावळ रेल्वे विभागातील भुसावळ-जळगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचा समावेश आहे. मात्र, हा प्रकल्प गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पूर्ण झाला असून, या तिसऱ्या मार्गांवरून रेल्वेची वाहतुकही सुरू झाली आहे.
रेल्वे मार्गाचा हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान गेल्या वर्षापासून चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाने २. ६१ कोटींचा निधी मंजुर केला असून, आतापर्यंत १. ८० कोटींचा खर्च या कामावर झाला आहे.
डिसेंबर पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव ते भुसावळ या चौथ्या रेल्वे मार्गातील जळगाव ते भादली दरम्यान कामाला सुरूवात करण्यात आली होती. हे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर भादली ते भुसावळ दरम्यानही ५० टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होऊन, संपूर्ण हा रेल्वे मार्ग डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता जळगाव ते भुसावळ दरम्यान पुन्हा चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत हा मार्गही पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- पंकज डावरे, उप मुख्य अभियंता, रेल्वे निर्माण विभाग