भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 06:00 PM2018-09-29T18:00:49+5:302018-09-29T18:01:38+5:30
पालिकेला मिळालेला पुरस्कार ‘मॅनेज’ करून मिळाल्याचा ‘जनाधार’चा आरोप
भुसावळ, जि.जळगाव : येथील पालिकेला स्वच्छता अभियानाचा मिळालेला पुरस्कार हा मॅनेज करून मिळवला असल्याचा आरोप जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी केल्यामुळे पालिकेच्या सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे अवघ्या सात मिनिटात २१ विषयांना सत्ताधारी गटाने आवाजी मताने मंजुरी देऊन सभा संपल्याचे जाहीर केले.
दरम्यान, विरोधकांना सध्या शहरात सुरू असलेली विकास कामे पाहवली जात नाही. यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठले असल्याची टीका नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केली आहे.
पालिकेच्या सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता सभेस प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, उपमुख्याधिकारी एस. जे. देशपांडे, गटनेते मुन्ना तेली उपस्थित होते.
एक ते चार विषयांना सभागृहाने सर्वानुुमते मंजुरी दिल्यानंतर स्वच्छता महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला मिळालेला पुरस्कार मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्याबाबत विचारविनिमय करणे या पाचव्या विषयाचे वाचन सुरू असताना जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी हा पुरस्कार मॅनेज करून मिळवला असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ निर्माण झाला. सत्ताधारी गटाचे नगरसेवक व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच हमरी- तुमरी झाली. सत्ताधारी गटाचे नगरसेवक विरोधकांवर चांगलेच तोडून पडले. प्रसंगी सभागृहातील वातावरण पाहून नगराध्यक्ष भोळे यांनी १ ते २१ विषयांना आवाजी मताने मंजुरी देऊन सभा संपल्याचे जाहीर केले .
दरम्यान, जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी गढूळ पाण्याची एक बाटली भरून आणली होती. यावेळी नगराध्यक्ष भोळे यांनी हे पाणी गढूळ असले तरीसुद्धा शुद्ध असल्याचे सांगितले. हतनूर धरणाचे नुकतेच ३६ दरवाजे उघडण्यात आले होते. यावेळी तापी नदीला गढूळ पाणी आले होते. आपल्या पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र हे अतिशय जुने आहे. यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करण्यात येते. मात्र पाण्याचा रंग बदलविण्यात येत नसल्याची माहिती नगराध्यक्ष भोळे यांनी दिली. त्यामुळे पाणी गढूळ असले तरी शुद्ध असते, असा दावा त्यांनी केला, तर अमृत योजनेमध्ये गढूळ पाणी शुद्ध करण्यात येणार असल्याची सुविधा असल्याचे भोळे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य शासनाने दिलेला पुरस्कार हा एक समिती नेमून दिलेला असतो. त्यामुळे या पुरस्कारांसाठी निवड ही काटेकोरपणे केली जाते. मात्र पुरस्कारच मॅनेज करून मिळाला असल्याचा आरोप म्हणजे राज्य शासनाच्या त्या समितीवर संशय घेण्यासारखे असल्याची टीका नगराध्यक्ष भोळे यांनी केली.
तसेच शहरात अमृत योजना, एल.ई.डी. लाईट, नपा दवाखान्यातील सुविधा यासह अनेक कामे सुरू आहे. ही कामे विरोधकांना सहन होत नाही. यामुळे त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन सर्वसाधारण सभेत गदारोळ केला असल्याचा आरोपही केला आहे.
सभेस नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक निर्मल कोठारी, राजेंद्र नाटकर, मेघा वाणी, रमेश नागराणी, अॅड.बोधराज चौधरी, अमोल इंगळे, प्रा.दिनेश राठी, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, महेंद्रसिंग ठाकूर, जनाधार पार्टीच्या नगरसेविका पुष्पा सोनवणे, कविता चौधरी यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.