भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारा खड्ड्यांना दिला मुरूमाचा मुलामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 04:34 PM2020-08-28T16:34:53+5:302020-08-28T16:35:05+5:30
भुसावळ शहरात अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे.
भुसावळ : शहरात अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजण्या पलीकडचे गणित आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची अजून वाट लागली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारे मुख्य रस्त्यासह प्रभागांमध्ये खड्ड््यांमध्ये मुरूम टाकून रस्त्यांना मुलामा दिला आहे.
शहरात रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. कधी खड्ड्यांमध्ये कागदी नावा टाकून आंदोलन करण्यात येते तर कधी खड्ड्यांमुळे वेदनाशामक बाम देऊन पालिकेचे लक्ष वेधण्यात येते. अशातच प्रभाग १८ मध्ये सततच्या पावसामुळे रस्त्यांची नाचक्की झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पदरमोड करून तब्बल ३५ ट्रॅक्टर मुरुमाद्वारे खड्ड्यांना मुलामा देण्याचे काम सुरू केले आहे. यात मुख्य जामनेर रस्ता, अष्टपूर मंदिरासमोरचा काही भाग, सदानंद डअेरीसमोरचा काही भाग, जुने तालुका पोलीस स्टेशनसमोर, गंगाराम प्लॉट, पोस्ट आॅफिस, राठोड बिल्डिंग, श्रीराम गणेश मंडळ तसेच मित्र गणेश मंडळ या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे.
अमृत योजनेचे काम होईपर्यंत शहरात रस्ते पक्के करता येणार नाही, असे शासनाचे निर्देश असल्याचे सांगण्यात येते. मात्र सद्य:स्थितीतील रस्ते अत्यंत वेदनादायक आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरात फेरफटका मारल्यास नक्कीच कुठे ना कुठे खड्ड्यांमध्ये पाय गेल्याशिवाय राहत नाही. अशातच पाठीचे, मणक्याच्या व्याधी नागरिकांना जडत आहत. हा काही नवीन विषय राहिलेला नाही. यातच गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पावसाने रस्त्यांची अजूनच बिकट परिस्थिती केली आहे. किमान आपल्या प्रभागात तरी लोकांना खड्ड्याचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने धांडे यांनी यांनी मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
पालिका प्रशासनाने अमृत योजना पूर्ण होईल तेव्हा रस्ते करण्याचे आदेशाच्या पालन करावे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात लोकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने तरी रस्त्याची डागडुजी मुरूम टाकून मार्ग काढावा व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.