सहा महिन्यात भुसावळला ` रेल नीर` प्रकल्प सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:40+5:302021-02-07T04:15:40+5:30
जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत `रेल्वे नीर ` प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. येत्या सहा ...
जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत `रेल्वे नीर ` प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून, या प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती आयआरटीसीचे उप महाव्यवस्थापक आनंद झा यांनी `लोकमत` शी बोलतांना दिली.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत भुसावळला गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे नीर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. भुसावळातील एमआयडीसीत हा प्रकल्प उभारला जात आहे. हैदराबाद येथील हायमॅक्स कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मशिनरींची उभारणी करण्यात येत आहे. ८ हजार ५५० चौरस मीटर मध्ये हा प्रकल्प उभारला जात असून, यासाठी ८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तीन पाळीत कर्मचारी काम करणार असून, २४ तासात ७२ हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या तयार होणार आहेत. ही पाण्याची बॉटल भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर १५ रुपये किंमतीला विक्री करण्यात येणार आहे. इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल विक्रीला बंदी घालण्यात येणार आहे.
इन्फो :
महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प
भुसावळ एमआयडीसीत उभारण्यात येणारा ` रेल नीर ` चा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प ठरणार आहे. सध्या राज्यात नागपूर व अंबरनाथ येथे प्रकल्प सुरू असून, लवकरच भुसावळ येथेही सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पात मनुष्यबळाच्या भरतीसाठी आयआरसीटीसीतर्फे लवकरच नोकर भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून, स्थानिक योग्य अहर्ता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. साधारणत : १०० ते १२५ जागांची या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार असल्याचे आयआरसीटीसीतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
आयआरसीटीसीतर्फे भुसावळला ` रेल नीर` प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल. २४ तासात ७२ हजार पाण्याच्या बॉटल तयार होणार आहे. या प्रकल्पात स्थानिक तरुणानांच नोकरीची संधी देणार आहोत.
आनंद झा, उप महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी, दिल्ली.