विशेष उत्सव गाड्यांमुळे भुसावळ रेल्वे विभागाची कोटी की कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 03:47 PM2020-12-15T15:47:48+5:302020-12-15T15:49:14+5:30
रेल्वे प्रशासनातर्फे अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे
वासेफ पटेल
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे, महिन्याभरात भुसावळ विभागातून तब्बल ११२ गाड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्यांच्या माध्यमातून भुसावळ विभागाला १६ कोटींची व भुसावळ रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवरून १ कोटी २० लाखांची कमाई रेल्वे प्रशासनास प्राप्त झाली. मात्र तत्काळ तिकीट बुकींग वेळेस तेच तेच चेहरे तिकिट खिडकीवर असल्यामुळे सामान्यांना मात्र तत्काळ तिकीट मिळत नाही.
रेल्वे प्रशासनातर्फे अनलॉक प्रक्रियेनंतर बऱ्याच अंशी ‘सुसाट रेल्वे वेळेवर रुळावर’ आलेली आहे. भुसावळ विभागातून गेल्या महिन्याभरात प्रवाशांसाठी तब्बल ११२ गाड्या सुरू करण्यात आल्या यातील ५० उत्सव गाड्या म्हणून धावत आहे तर ६२ गाड्या ह्या विशेष गाड्या म्हणून धावत आहे.
गेल्या महिन्याभरात भुसावळ रेल्वे विभागातून तब्बल ३ लाख ६९ हजार ९९४ प्रवाशांनी तिकीट काउंटरवरून बुकिंग केली यातून रेल्वेला १५कोटी ९५ लाख ४७ हजार ४६ रुपयाचे उत्पन्न मिळाले, तर याच काळामध्ये फक्त भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरून ७३ हजार ३५० प्रवाशांनी तिकीट बुकिंग केली. यातून रेल्वेला एक कोटी १८ लाख ६२ हजार ३९१ इतके उत्पन्न प्राप्त झाले.
ऑनलाइन होते ४० टक्के बुकिंग
रेल्वे तिकीट खिडकीच्या व्यतिरिक्त अनेक प्रवासी हे आरक्षण कार्यालयातून तिकीट बुकिंग न करता ऑनलाइन तसेच आयआरसीटीसीच्या एजंटद्वारे तिकीट बुकिंग करत असतात या माध्यमातल्यासुद्धा रेल्वेला सुमारे ४० टक्के वेगळे उत्पन्न प्राप्त होते.
दलालांचा तत्काळ तिकीट खिडकीवर विळखा
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेळेवर तिकीट बुकिंग करता यावी याकरिता सामान्य व्यक्ती हे सकाळी अकराला सुरू होणाऱ्या तत्काळ तिकीटासाठी दोन तासापूर्वी रांगेत नंबर लावत असतात. टोकनद्वारा तत्काळ खिडकीवर नंबर लावण्यात येत असतो. मात्र सक्रिय दलाल हे आपले पंटर पाठवून सामान्य व्यक्तीच्या आधीच आपले नंबर लावतात. तेच ते चेहरे तत्काळ तिकीट बुक करत असतात. यामुळे सामान्य व्यक्तीला तिकीट उपलब्ध होत नाहीत व तेच तिकीट ते दलालाकडून चढ्या भावाने नाइलाजाने घ्यावे लागत असतात. रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसांचे सीसीटीवी फुटेज तपासल्यास त्यांना तेच ते चेहरे आलेले असल्याचे निदर्शनास येतील, अशी प्रतिक्रिया तत्काळ तिकीट खिडकीच्या वेळेस उभे राहून तिकीट न मिळाल्या सामान्य नागरिकांकडून मिळाल्या.
सोशल डिस्टन्सिंग नाहीच
रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तिकीट बुकिंग करण्यात येणाऱ्यांसाठी कुठलाही प्रकारचे उपाययोजना केलेले नाही. तिकीट काऊंटरवर कुठलाही प्रकारचे सोशल डिस्टन्स ठेवले जात नाही. मात्र जे कर्मचारी तिकीट बुकिंग करत असतात त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी फक्त नावाची व्यवस्था व सुरक्षा न लावता नियमाचे पालन केले जातील या पद्धतीचे कामकाज असावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.