भुसावळ रेल्वे विभागाच्या उत्पन्नात 8.56 टक्के वाढ
By admin | Published: April 27, 2017 04:38 PM2017-04-27T16:38:01+5:302017-04-27T16:38:01+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच सेवांमध्ये उद्दिष्टापेक्षा 8.56 टक्के इतकी वाढ मिळविण्यात यश
ऑनलाइन लोकमत / पंढरीनाथ गवळी
भुसावळ, जि. जळगाव, दि. 27 - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच सेवांमध्ये उद्दिष्टापेक्षा 8.56 टक्के इतकी वाढ मिळविण्यात यश मिळविल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली. यावर्षी भुसावळ विभागाला 1287.68 कोटी रुपयांचे उपन्न मिळाले आहे. ते मागील वर्षी 1186.11 कोटी इतके होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेच्या या उत्पन्न वाढीत डीआरएम आर.के.यादव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगण्यात आले.
विभागाला प्रवासी वाहतुकीत यावर्षी 0.76 टक्के उत्पन्न मिळाले. पार्सल वाहतुकीद्वारे 7.44 टक्के इतकी वाढ झाली. गेल्यावर्षी ती 36.83 कोटी होती.आता ती 39.57 कोटी आहे. मालवाहतुकीतून 16.03 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ गेल्यावर्षी 545.44 कोटी होती. ती यावर्षी 632.90 कोटी झाली आहे.
कांदा वाहतूक
या विभागाला कांदा वाहतुकीतून यावर्षी 68.8 टक्के उत्पन्न मिळाले होते. ते मागील वर्षी 59.43 कोटी होते. यावर्षी ते 99.89 कोटी इतके झाले. मका वाहतुकीत मागील वर्षी 3.48 कोटी रुपयाचे उत्पन्न आले होते. ते यावर्षी 55.97 कोटी इतके आले आहे.
भुसावळ विभागाने रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी वर्षभर विविध ठिकाणी तिकिट तपासणी मोहीम राबविली त्यातून या वर्षी 23.95 कोटी उत्पन्न मिळाले. पार्किग सेवेतून विभागाला 17.86 टक्के वाढ मिळाली आहे.
तिकीट तपासणी मोहिमेची कोठेही चर्चा केली जात नाही. कर्मचारी, अधिकारी यांना गाडी व वेळ सांगितली जात नाही. या नंतर अचानक रेल्वेस्थानकावर जाऊन तिकीट तपासणी केली जात आहे. याचा फुकटय़ा प्रवाशांनी धसका घेतला आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. यात अपंग व ज्येष्ठ प्रवाशांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सोय करण्यात आली आहे शिवाय आरओ वॉटरची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, फलाटाची लांबी वाढवून त्यावर शेडची सोय करण्यात आली आहे. आरक्षणात कॅशलेसचा वापर होत आहे.
4 लाख प्रवाशांना दंड
प्रवासाचे तिकिट न घेता व सामान बूक न करता प्रवास करणा:या सुमारे 4 लाख प्रवाशांना यावर्षी दंड करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 23.95 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मागील वर्षी या विभागाने 396.94 हजार फुकटय़ा प्रवाशाविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.ती या वर्षी वाढून 398.23 हजार इतक्या फुकटय़ा प्रवाशांविरुद्ध दंडाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिकिट तपासणी करताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे सहाय्य घेऊन कोठेही व कोणत्याही प्रवासी गाडीत तिकिट तपासणी मोहीम राबविली जात असल्याची माहिती देण्यात आली. मागील वर्षी बसने जाऊन तिकिट (बस चेक) तपासणी मोहीम राबविण्यात आली.यवर्षी देखील बसचेक मोहीम राबविली जाईल, असे सांगण्यात आले.
प्रवासी संख्या घटली
भुसावळ हे या विभागाचे मुख्यालय आहे. येथे डीआरएम कार्यालय आहे. मोठे स्थानक आहे. अशा या स्थानकावरून प्रवास करणा:या प्रवाशांच्या संख्येत 1.30 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2016-17 मध्ये 580.70,2015-2016 मध्ये 588.33 प्रवासी संख्या होती.असे असलेतरी उत्पन्नात 0.76 टक्के इतकी वाढ झाली.
रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा. कोणत्याही क्षणी, ठिकाणी व वेळी अचानक तिकीट तपासणी होऊ शकते. तिकीट नसल्यास जेलमध्ये जावे लागेल.
- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.