भुसावळ तालुक्यात पिकांची नुकसान भरपाई मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:55 PM2020-08-19T19:55:32+5:302020-08-19T19:57:01+5:30
भुसावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
भुसावळ : तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, महसूल यंत्रणेमार्फत सरसकट पंचनामे करून तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी केली आहे.
तालुक्यात मागील सहा सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे किन्ही, खडका , तळवेल, पिंपळगाव खुर्द, दर्यापूर, सुनसगाव, वांजोळा जोगलखेडा, पिंपळगाव बुद्रूक, वेल्हाळा, सुसरी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून उडीद, मूग,तुर,कपाशी, मका, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. जोरदार पावसामुळे किन्ही, सुनसगाव, वांजोळा, जोगलखेडा, खडका या ठिकाणी संततधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहे. या पावसामुळे मूग,उडीद, भुईमूग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मूग व उडीद या पिकांच्या तोडणीस आलेल्या शेंगांना झाडावरच कों फुटले असून, ते पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच कोरोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याहीवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी-बियाणे, खते आदींचा मोठा खर्च करून खरिपाची लागवड केली.
सलग सहा सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने महसूल विभागामार्फत सरसकट पंचनामे करावे, अशीही विनंती त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.