कोरोना संकट दूर व्हावे यासाठी भुसावळच्या महिलेचा महिनाभर अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 02:54 PM2020-09-17T14:54:38+5:302020-09-17T15:58:12+5:30
आरती सांखला जैन धर्मातील ‘मासखमण तप’ सलग ३० दिवसांचे उपवास कोणतेही अन्न न खाताना, फक्त पाण्यावर केले.
भुसावळ : कोरोनाच्या जागतिक महासंकटातून संपूर्ण मानवजातीने सुखरूप बाहेर पडावे, या काळात गोरगरिबांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा दूर व्हाव्यात, सर्वांना रोजगार मिळावा या उद्देशातून येथील डॉ.सुदेश सांखला यांच्या पत्नी आरती सांखला जैन धर्मातील ‘मासखमण तप’ सलग ३० दिवसांचे उपवास कोणतेही अन्न न खाताना, फक्त पाण्यावर केले.
कठीण अशा या तपसाधनेत त्यांचे ध्यान जप सुरू होते. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या कोरोनापासून भारतासोबतच संपूर्ण जगची सुटका व्हावी याकरिता विशेष मंत्रजप केले.
१५ आॅगस्टपासून सुरू असलेल्या या तपश्चर्येची सांगता १४ सप्टेंबरला अन्नग्रहण करून मासखमणचे पारणे करून करण्यात आली. गेल्या ११ वर्षात त्यांचे हे दहावे मासखमण होते. कठीण अशा या तपश्चर्येत आरती सांखला यांना भरपूर त्रास झाला, परंतु दृढनिश्चयी उपासिका सांखला यांनी या शारीरिक कष्टांवर मात करून तपश्चर्या पूर्ण केली हे विशेष.
त्यांच्या या तपसाधनेत त्यांचे पती डॉ.सुदेश, मुलगी कृतिका, मुलगा जिनेश यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले. त्याचबरोबर हैदराबाद येथे चातुर्मास प्रवास करीत असलेले आचार्य श्री महाश्रमाण व त्यांचे अज्ञानुवरती मुनि श्री ज्ञानेन्द्र मुनि यांचे विशेष मंगल आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते युसूफ बागवान, नगरसेवक निर्मल कोठारी, व्यावसायिक अनिल जैन, जे.बी.कोटेचा, दिनेश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले.