भुसावळात युवकांना पोलीस भरती सरावासाठी हक्काचे मैदानच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:14 PM2020-09-23T21:14:03+5:302020-09-23T21:15:55+5:30
युवकांना पोलीस भरती सरावासाठी हक्काचे मैदानच नाही
वासेफ पटेल
भुसावळ : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरच राज्यांमध्ये १२ हजारावर पोलीस भरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी शहरातील युवक वर्ग आपापल्या परीने कसून सराव करीत आहे. मात्र हक्काच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या होणऱ्या व्यावसायिक वापरासह मातीचे ढीग व पाण्याने तुंबलेले खड्डे यामुळे युवकांना पोलीस भरतीच्या सरावासाठी खड्डेमय रस्त्यांसह शेत शिवाराचा सहारा घ्यावा लागत आहे.
भुसावळ शहर समस्यांचे माहेरघर झाले असून रस्ते, प्रत्येकबाबत शहरात अनंत अडचणी आहेत.
कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, याशिवाय ‘पोलीस दादा’ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या युवक वर्गाला सरावासाठी हक्काचे मैदान नाही. शहरातील एकमेव असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा व्यावसायिक वापर होत असतो. कधी फटाके दुकान, कधी लग्न समारंभ, राजकीय सभा, आनंद मेला, विविध प्रदर्शने यातच वर्षभर मैदान बुक केलेले असते. अर्थात कोरोना काळात अशा सर्वच जाहीर कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
ज्या उद्देशातून मैदानाचा वापर खेळाडूंकडून विविध स्पर्धा व सराव करून केला जातो, तो उद्देश कधीच सार्थ झाल्याचे अनेक वर्षांपासून दिसून येत नाही.
पोलीस भरतीचा सराव करावा कुठे?
राज्यात लवकरच १२ हजारांवर पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. यासाठी युवक जोमाने तयारीला लागले आहेत. शहरातील रस्ते खड्डेमय असले तरीही पर्वा न करता युवकवर्ग सकाळ -संध्याकाळ धावण्याची सराव करीत आहे. याशिवाय महामार्गाच्या सुरू असलेल्या सर्व्हिस रोडवर अनेक युवक घाम गाळून कसरत करीत आहेत. अर्थातच हक्काचे डॉ.आंबेडकर मैदान असूनही त्याचा काही उपयोग नाही, असा सूर व नाराजी युवकवर्गातून उमटत आहे.
मैदानावर मातीचे ढिग, पाण्याचे तळे
डॉ.आंबेडकर मैदानावर मोठमोठे मातीचे ढिग आहेत. याशिवाय उरलेल्या मैदानावर शहरातील रस्त्यांसारखेच मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचले आहे. उरलेल्या मैदानात मोठ गवत, काटेरी झुडपे वाढली आहेत.
१५ आॅगस्ट व २६ जानेवारीला टाकला जातो कच
१५ आॅगस्ट व २६ जानेवारीला शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात येते. अर्थातच फक्त वर्षातूून दोन दिवस या ठिकाणी कच टाकून मैदानाची वरवर साफसफाई करण्यात येते. यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होऊन जाते.
पालिका सर्वसाधारण सभेत मैदानाचा विषय घेऊन प्रत्यक्षात कृती हवी
कोरोना काळात पालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नाही. येत्या काही दिवसात सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेत मैदानाचा विषय घेऊन त्वरित मैदान साफसफाईसह अत्याधुनिकीकरण करण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींसह, प्रशासकीय अधिकारी यांनी केले पाहिजे अर्थातच युवकांना कृती हवी आहे, आश्वासन नको.
मैदान तयार झाल्यास होणार परिपूर्ण सराव
मैदान लवकरच तयार झाल्यास अगदी वेळेच्या हिशोबाने युवकांना मैदानावर सराव करता येईल. याशिवाय गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी यासाठी एकाच ठिकाणी सराव करणे सोयीचे होईल.
शहरात योगा दिवस, मॅरेथॉन, सायकलिंग आदी कार्यक्रम होत असतात. त्यावेळेस मैदानाचे महत्त्व सांगितले जाते. मात्र कृती कुठे करावी, असा प्रश्न पडतो. आतातरी मैदानाचा विषय गांभिर्याने घेऊन मैदान साफसफाईसह कृती करावी, अशी रास्त अपेक्षा युवकांकडून करण्यात येत आहे.
मैदानाचा विषय महत्त्वाचा आहे. युवकांच्या दृष्टिकोनातून मैदानी सराव व्हावा, याकरिता लवकरात लवकर मैदानाचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
-संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ.
हक्काचे मैदान नसल्यामुळे खड्डेमय रस्त्याचा सहारा घेऊन धावण्याचा सराव सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत पोलीस भरतीची परीक्षा पास करण्यासाठी ध्येय निश्चित केले आहे.
-राहुल कोळी (पोलीस भरतीसाठी सराव करणारा युवक)
जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाºया या भुसावळ शहरात मैदान नाही, ही मोठी शोकांतिका आहे. लवकरच मोठी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. मैदान नसल्यामुळे शेतशिवाराकडे सराव करावा लागतो. लवकरच मैदानाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
-प्रतीक कुलकर्णी (पोलीस भरतीसाठी सराव करणारा युवक)