भुसावळच्या अमृत योजनेला मिळणार नवसंजीवनी -पालकमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 02:06 AM2020-09-01T02:06:45+5:302020-09-01T02:11:17+5:30
भुसावळच्या अमृत योजनेला नवसंजीवनी मिळणार आहे.
भुसावळ : शहरातील सध्या अडगळीत पडलेल्या तसेच मुदत संपूनही पूर्णत्वाला न आलेल्या अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने नवसंजीवनी मिळणार आहे. मूळ ९० कोटींच्या या योजनेच्या १५८ कोटी रुपयांच्या नवीन सुधारित आराखड्याला मंजुरी देणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिली. यामुळे शहराच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होणार आहे.
भुसावळ शहरात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य असून नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठादेखील करण्यात येत नाही. या समस्येची गंभीर दखल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी सोमवारी जळगाव येथे अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. यात या योजनेच्या कार्यान्वयबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला.
भुसावळ शहरात २२ मे २०१७ रोजी ९० कोटी ८४ लाख ५१ हजार रूपयांच्या अमृत योजनेला मान्यता देण्यात आली. यानंतर २६ ऑक्टोबर २०१७ रोजी मे. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, जळगाव या कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. या योजनेची मुदत दोन वर्षांची असली तरी मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप याचे काम पूर्णत्वाकडे आलेले नाही. यात योजनेतील २१३ किलोमीटरपैकी १४० किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम झालेले आहे, तर पाण्याच्या ११ टाक्यांपैकी ९ टाक्यांचे काम सुरू झालेले आहे.
शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असले तरी कोविड-१९चा प्रादूर्भाव आणि नंतर पावसाळ्यामुळे वितरण व्यवस्था व रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. याआधी पाण्याचा स्त्रोत हा शहरातील तापी नदीच्या पात्रात होता. हा स्त्रोत बदलून शेळगाव बंधार्याच्या वरील भागात साकेगाव शिवारात घेण्यात आला असून यासाठी मजिप्रा नाशिक येथे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमिवर, आजच्या बैठकीत मजिप्रातर्फे ९० कोटीऐवजी सुधारित १५८ कोटी रूपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अमृतच्या मूळ योजनेचे काम येत्या मार्चअखेरीस पूर्णत्वाकडे येऊन नंतर सुधारित कामास प्रारंभ करण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले. यात जानेवारी २०२१ पर्यंत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण करावे आणि ८ जलकुंभ हे मार्च २०२१ तर तीन जलकुंभ हे जुलै २०२१ अखेरीस पूर्ण करावे, असे निर्देश जैन इरिगेशनला या बैठकीत देण्यात आले. परिणामी अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने व आमदार संजय सावकारे यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळणार आहे.
या बैठकीला आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील, नगरसेवक मनोज बियाणी, मजिप्राचे अभियंता निकम, भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चंद्रवार, प्रकल्प अभियंता वाघ, जैन इरिगेशनचे अधिकारी भिरूड आणि ललवाणी आदी उपस्थित होते.