भुसावळचे भाजप आमदार सावकारे यांच्या शुभेच्छा फलकावरून गिरीश महाजन गायब, तर खडसे मात्र चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:20 PM2020-12-11T17:20:27+5:302020-12-11T23:09:21+5:30
भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर व सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये माजी मंत्री तथा नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचा प्रभाव दिसून येत असल्यामुळे आमदार सावकारे हेही राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत मिळत आहे.
भुसावळ : येथील भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर व सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये माजी मंत्री तथा नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचा प्रभाव दिसून येत असल्यामुळे आमदार सावकारे हेही राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत मिळत आहे. या फलकांवरून तथा जाहिरातींवरून भाजपचे चिन्ह असलेले कमळ तसेच माजी मंत्री तथा भाजपचे जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांचेही फोटो नसल्यामुळे या संकेताला बळकटी मिळत आहे.
भाजपचे मोठे नेते म्हणून ओळख असलेले तथा नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी हातावर घड्याळ बांधले व भविष्यात कोणते आमदार व नेता त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचप्रमाणे माझ्यासोबत भाजपचे अनेक आमदार असल्याचे संकेतही त्यांनी त्यावेळी दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष होत असल्यामुळे त्या आमदारांना माझ्यासोबत प्रवेश करणे अडचणीचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आमदार सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे, यांच्यासह काही ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे व जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचे फोटो दिसत आहे. याचबरोबर नगराध्यक्ष रमण भोळे व इतर पदाधिकारी यांचेही फोटो जाहिराती तथा बॅनरवर चमकले आहेत. मात्र या बॅनर व शुभेच्छा जाहिरातींमध्ये भाजपचे निशाणी कमळासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांचा कुठेही फोटो चमकत नसल्यामुळे आमदार सावकारे हे खडसे सोबतच आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२००९ साली आमदार सावकारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळाले होते. मात्र २०१४ साली आमदार सावकारे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तत्कालीन विरोधी पक्षनेते खडसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळेपासून ते खडसे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. २०१४ मध्ये सावकारे हे खडसे यांच्या प्रभावाचा फायदा घेऊन मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. त्यानंतर २०१९ सालीही त्यांनी भाजपतर्फे खडसे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घडवली व मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. २०१४ पासून सावकारे यांना खडसे समर्थक म्हणून राज्यात ओळखले गेले.
सावकारे यांनी व त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसानिमित्त लवकरच लावण्यात आलेल्या बॅनर, पोस्टरवरून आपण खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार किंवा त्यांच्यासोबत आहेत, हे सोशल मीडिया व जाहिरातीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. या जाहिरातींमध्ये माजी मंत्री खडसे यांच्या मुंबई येथील प्रवेशाच्या वेळेस भुसावळ येथील ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व त्यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्या फोटोला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील या चर्चेनंतर आमदार सावकारे यांनी आपण भाजपातच आहोत व भाजप आताच राहणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. जाहिरातींमध्ये कार्यकर्त्यांनी टाकलेले फोटो हे त्यांच्या प्रेमापोटी टाकले असल्याचे जाहीर केले आहे.