भुसावळच्या कृष्णाच्या उपग्रहाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:49+5:302021-06-05T04:12:49+5:30
भुसावळ : अंतराळात सोडलेल्या उपग्रहांमधून उत्कृष्ट उपग्रहाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. यात भुसावळच्या ताप्ती पब्लिक ...
भुसावळ : अंतराळात सोडलेल्या उपग्रहांमधून उत्कृष्ट उपग्रहाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. यात भुसावळच्या ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावीचा विद्यार्थी कृष्णा सतीश ढाके याने सोडलेल्या उपग्रहाचाही सहभाग आहे. त्याबद्दल कृष्णा यास गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.
या संशोधनामुळे भविष्यात विविध संशोधन करणाऱ्या संस्थांना भेट देण्याची मोठी संधी मिळू शकते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाउस ऑफ कलाम व स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेब्रुवारी २०२० रोजी रामेश्वरम येथे अंतराळात लहानलहान असे छोटेछोटे १०० उपग्रह सोडण्याचा महत्त्वाकांक्षी जागतिक विक्रम करण्यात आला. त्यात देशभरातील एक हजार व महाराष्ट्रातील ३८० विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच नागपूर व पुणे येथे एक दिवसाचे वर्कशॉप घेण्यात आले. त्यात कृष्णा ढाके याने सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी छोटेछोटे फेम्टो सॅटेलाइट बनवले होते. हेलियम बलूनच्या साहाय्याने १०० उपग्रह अंतराळात सोडण्यात आले.
याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यशस्वी नोंद झाली. कृष्णा हा गण गण गणात बोते आयटीआयचे अध्यक्ष सतीश ढाके यांचा मुलगा आहे.
ताप्ती पब्लिक स्कूलच्या या दहावीच्या विद्यार्थ्याचे नाव गिनीज बुक व इतर ठिकाणी गेल्याने त्याचे शाळेच्या प्राचार्या नीना कटलर यांनी कौतुक केले. यासाठी त्याला ठाणे येथील प्रा.डॉ. मिलिंद चौधरी, मनीषा चौधरी यांचे सहकार्य लाभले.