यावल येथे दुचाकीचे टायर फुटून एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 05:11 PM2019-04-22T17:11:59+5:302019-04-22T17:13:43+5:30
भुसावळ रस्त्यावरील घटना
यावल : मोटारसायकलच्या पुढील चाकाचे टायर फुटल्याने मोटारसायकलचा तोल जावून झाडाला जबरदस्त धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला असून, दोन जण गंभीर जख्मी झाले. ही घटना सोमवारी सकाळी शहरातील भुसावळ रस्त्यावर निमजाय माता मंदिराजवळ घडलीे.
सूत्रांनुसार, रईस गुलाम रसुल (वय ३०, रा.यावल), कलीम शेख बशीर (वय ३०, रा. रावेर) व शेख अजीम शेख सैफोदीन (वय २८, रा.अडावद, ता.चोपडा) हे तीन बांधकाम मजूर भुसावळ येथे मोटारसायकल (एमएच-१९-एसी-७१३१) ने जात होते. तेव्हा यावल शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या निमजायमाता मंदिराजवळ त्यांच्या मोटारसायकलचे टायर फुटले. यामुळे मोटारसायकल निंबाच्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात अडावद येथील राहणारा शेख अजीम शेख सैफोद्दीन हे जागीच ठार झालेत, तर रईस गुलाम रसूल व शेख कलीम शेख बशीर हे गंभीर जखमी झाले.
जखमीवर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी नेपाली भोळे, आरती कोल्हे, चिंटू बागुल यांनी प्रथमोपचार केले. यानंतर त्यांना तत्काळ जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.