दुचाकी बाळगणे आता झाले डोईजड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:53+5:302021-07-16T04:12:53+5:30
भुसावळ : दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव सातत्याने वाढत आहेत. इतिहासात कधीच नव्हे पेट्रोल प्रतिलिटरने शंभरी ओलांडली आहे. याच बरोबर दुचाकी ...
भुसावळ : दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव सातत्याने वाढत आहेत. इतिहासात कधीच नव्हे पेट्रोल प्रतिलिटरने शंभरी ओलांडली आहे. याच बरोबर दुचाकी दुरुस्तीचे भावही चांगलेच वधारले आहेत. महागाईच्या कचाट्यातून वाहन दुरुस्ती व त्यासाठी लागणारे साहित्यही सुटलेले नाही. दुचाकीच्या सर्व्हिसिंगपासून ते दुरुस्तीचा खर्चही साधारणतः ३० ते ४० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे बाइक रायडर्सच्या खिशाला चांगलीच झळ बसत असून, सर्वसामान्यांना दुचाकी बाळगणे परवडत नसल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण अर्थचक्र बदलले आहे. प्रत्येक क्षेत्राला आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते. वाहन क्षेत्रावरही चांगलाच परिणाम झालेला आहे. वाढत्या महागाईमुळे वाहनासाठी लागणारे विविध साहित्यांचे दर कंपन्यांकडून वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकीची सर्व्हिसिंग असो वा इतर कुठलीही दुरुस्ती करायची झाल्यास मागील वर्षीपेक्षा यंदा जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहन दुरुस्तीची कामेही जास्त असतात. लॉकडाऊनमध्ये दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांच्या हातालाही काम नव्हते, आता सर्व नियम शिथिल झाल्याने दुचाकी सर्व्हिसिंग व दुरुस्तीची कामे वाढलेली आहेत; परंतु सर्व्हिसिंग व दुरुस्तीसाठी दुचाकी घेऊन गेल्यानंतरच हे वाढलेले दर कळतात. त्यामुळे दुचाकी चालवणे आता महाग झाल्याचे दिसून येत आहे.
असे वाढले मजुरीचे दर!
मागील वर्षी आता
२५० सर्व्हिसिंग ३५०
१४० क्लच प्लेट २००
३२० कोन सेट ४००
१००० इंजिन काम १३००
१२० शॉकअप ऑइल १४०
साहित्यांच्या किमतीत अशी झाली वाढ
मागील वर्षी आता
१५० ब्रेक लाइनर २००
८० हेड लाइट ११०
५० इंडिकेटर ७०
९०० बॅटरी १३००
प्रत्येक घरात आहे दुचाकी
दुचाकी वापरणारा वर्ग म्हणजे सर्वसामान्य असतो. आता शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही प्रत्येक घरात दुचाकी वाहन आहेच. शिवाय बाहेर कुठल्याही कामासाठी जायचे असेल, तर दुचाकीशिवाय होत नाही. घरातील मुलेही दुचाकीशिवाय बाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुचाकीचा होणारा वापर बघता, त्यासाठी लागणारा खर्चही आवाक्याबाहेर जात आहे. दुचाकी दुरुस्तीचे हे दर शहरागणिक थोडेफार वेगळे आहेत.