उद्ध्वस्त कुटुंबाला मोठय़ा भावाचा आधार
By admin | Published: April 4, 2017 12:29 PM2017-04-04T12:29:02+5:302017-04-04T12:46:02+5:30
घराला आग लागल्याने संसाराची राख रांगोळी झाली. लहान भाऊ संकटात सापडल्याने मोठा भाऊ मदतीला धावल्याने आगीत सर्वस्व गेलेल्या दत्तात्रय माळी यांना आधार मिळाला आहे.
Next
ऑनलाई लोकमत/दीपक पाटील
धुळे, दि.4- घराला आग लागल्यामुळे लहान भावाच्या संसाराची झालेली राखरांगोळी व त्याचा संसार रस्त्यावर आल्याचे पाहून कापडणे गावातील दत्तात्रय देवराम माळी यांचे मोठे भाऊ शांताराम माळी हे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. दत्तात्रय यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांनी त्यांच्या घरात आश्रय दिला. त्यामुळे मोठय़ा भावाचे उदात्त प्रेम पाहून दत्तात्रय माळी यांना आधार मिळाला. दरम्यान, माळी कुटुंबाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधीही सरसावले असून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे.
येथील विठ्ठल मंदिराच्या समोर राहणारे दत्तायत्र देवराम माळी यांच्या 12 गाळ्यांच्या लाकडी घराला रविवारी आग लागली. या घटनेत त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. या आगीच्या घटनेनंतर त्यांचे मोठे भाऊ शांताराम यांनी त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
2 ट्रॅक्टर माती फेकली
आगीच्या घटनेमुळे दत्तात्रय माळी यांच्या घराची संपूर्णत: राखरांगोळी झाली होती. हे भयावह दृश्य पाहून ते पूर्णत: खचून गेले होते. त्यात पंचनामा रविवारी सायंकाळर्पयत पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या घरातील जळून खाक झालेला सामान व दोन ट्रॅक्टर माती बाहेर काढून ती गावापासून दूर अंतरावर फेकून दिली.
कैफियत मांडताना अश्रू अनावर..
सोमवारी दिवसभरात माळी कुटुंबाला या दु:खातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ त्यांचे मोठे भाऊ शांताराम माळी यांच्या घरात गर्दी करत होते. दत्तात्रय माळी यांच्या प}ी सुरेखा माळी या ग्रामस्थांपुढे त्यांची कैफियत मांडताना त्यांचे अश्रू अनावर होत असल्याचे दिसून आले.
हलाखीच्या परिस्थितीत जीवन
दत्तात्रय माळी हे हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. मोठय़ा मुश्किलीने कर्ज काढून त्यांच्या शेतात कापूस, गहू, हरभरा विक्री केला होता. त्याबदल्यात त्यांना 70 हजार रुपये रोख मिळाले होते. या पैशांतूनच पीक कर्ज व इतर देणी ते देणार होते. मात्र, तत्पूर्वीच आगीच्या घटनेत त्यांचे हे पैसेही जळाल्यामुळे दत्तात्रय माळी यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
माजी मंत्र्यांनी घेतली भेट
घटनेनंतर दत्तात्रय माळी यांची धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील व माजी जि. प. सदस्य बापू खलाणे, प्रा. रवींद्र निंबा पाटील, नूतन विद्यालयाचे चेअरमन संजय युवराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील उपस्थित होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी माळी कुटुंबीयांची सोमवारी सायंकाळी भेट घेतली. त्यांचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना संपर्क साधून माळी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगितले.