जळगावात राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान; सर्वांच्या नजरा प्रदेशाध्यक्षांकडे
By अमित महाबळ | Published: August 26, 2022 10:02 PM2022-08-26T22:02:16+5:302022-08-26T22:03:26+5:30
जे नेते, कार्यकर्ते मुंबईवारी करतात त्यांनीच सत्तेची चव चाखली. इतरांना तर जिल्हा कार्यकारिणीतही स्थान मिळाले नाही.
अमित महाबळ
जळगाव : सर्वात जास्त माजी आमदार, माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री असे पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी असतानाही जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सर्व दृष्टीने मजबूत नाही. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आगामी जि. प., पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षवाढीसाठी सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेण्याचा कानमंत्र जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना देणार का ? असा प्रश्न चर्चिला जात आहे. शनिवारी, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजेपासून पक्ष कार्यालयात आढावा बैठक आहे.
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत आहे पण तालुक्यांतील काही माजी आमदार व माजी मंत्री हे सोयीची भूमिका घेतात, त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. गेले अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सत्तेत होता. मात्र, जिल्ह्यातील वरिष्ठ नेते व मूठभर कार्यकर्ते यांनीच सत्तेत सहभाग घेतला. सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्यातील कोणत्याही प्रमुख अशा जिल्हास्तरीय शासकीय समित्यांमध्ये स्थान मिळाले नाही.
जे पक्षाचे विधानसभेचे उमेदवार होते त्यांनी आपली वर्णी डीपीसीत व इतर महत्वाच्या पदांवर लावून घेतली. काही प्रभावी नेत्यांनी आपली पत्नी व कुटुंबातील घटकांची तालुका पातळीवर महत्वाच्या पदांवर वर्णी लावल्याने हे नेते सामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतील का ? जे नेते, कार्यकर्ते मुंबईवारी करतात त्यांनीच सत्तेची चव चाखली. इतरांना तर जिल्हा कार्यकारिणीतही स्थान मिळाले नाही. काही ज्येष्ठ नेते व माजी आमदार हे आपण सांगू त्यांनाच पदाधिकारी करा, असे संबंधित फ्रंटल प्रमुखांना सांगून आपल्या तालुक्यात आपण निर्णय घेऊ, असा समज करून देतात. त्यामुळे इतर सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात स्थान मिळत नसल्याचा सूर आहे.
महानगरमधील वादात पक्षाचे नुकसान : जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचे काम संघटनेत चांगले असताना कुणाची तरी सोय व्हावी म्हणून त्यांना बाजूला केले गेले. गेल्या दोन वर्षात जळगाव मनपामधील एकही नगरसेवक, जि.प. सदस्य राष्ट्रवादीत आला नाही. एक वर्षावर आलेल्या मनपा निवडणुकीसाठी संघटना बांधणी गरजेचे आहे. जळगाव मनपाच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक होते, आज ही संख्या शून्य आहे.
साहेब, एवढी माहिती घ्या
तालुकावार आढावा घेताना प्रदेशाध्यक्षांनी त्या-त्या तालुक्यातील माजी आमदार, ज्येष्ठ नेते, पक्षाचे फ्रंटल पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांना आपापल्या तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक किती आहेत याची विचारणा केल्यास पक्षाची खरी स्थिती समोर येईल, असेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
जिल्हा नेतृत्वात बदल
जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील आहेत. त्यांना अध्यक्ष होऊन चार वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. दरम्यानच्या काळात जळगाव लोकसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर यांचा पराभव झाल्याने त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना मुक्ताईनगरमधून माघार घेण्यास लावल्याने त्यांनी पुन्हा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याविषयी पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत गंभीर दखल घेतली होती. त्यावेळी माजी आमदार सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या स्पर्धेत रवींद्र पाटील यांना संधी मिळाली. आता सतीश पाटील व गुलाबराव देवकर जिल्हा बँक निवडणुकीपासून एकत्र आहेत. त्या दोघांचाही जिल्हाध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो. यामुळे प्रभावी पर्याय समोर येऊ शकतो.
जिल्ह्यात महिला, युवती, विद्यार्थी, सेवादल आणि फ्रंटलचे भरीव काम दिसत नाही. पक्ष आता विरोधी बाकांवर असल्याने व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाडाझडती होऊन सर्वच फ्रंटलची पुनर्बांधणी व नवीन नेतृत्व समोर आणणे पक्षाचे हिताचे राहील, असेही कार्यकर्ते म्हणायला लागले आहेत.