पितृपक्षामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:45 PM2020-09-05T12:45:56+5:302020-09-05T12:46:10+5:30
पालेभाज्यांची आवक घटली : कोथंबीरीचा भाव चढाच, भरीताची वांगीही पोहचली ५० रुपयांवर
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्याने पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. पितृपक्ष सुरू झाल्याचा देखील बाजारावर परिणाम झाला आहे.
सातत्याने बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. मात्र त्यासोबत पितृपक्षात श्राद्धसाठी लागणाऱ्या भाज्यांची आवक वाढली आहे. पहाटे बाजार समितीत सुमारे ३५ क्विंटल गंगाफळ आले होते. तर वाल, गवार या भाज्यांचेही दर गगनाला भिडले आहेत. गणेश कॉलनी रस्ता, महाबळ रस्ता, गिरणा टाकी चौक या भागात भाजी बाजार भरला होता. जळगावच्या कृषी उत्त्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा आवक सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली. जळगावच्या बाजारात परराज्यातूनही भाजी येते. मात्र आज ही आवकदेखील कमीच होती. आवक कमी असल्याने जळगावकरांना भाजीची खरेदी करण्यासाठी आज देखील जादा पैसे मोजावे लागेल.
ऐरवी २५ रुपये किलोने विकली जाणारी भरीताची वांगी आज ५० रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. लहान वांगीदेखील ४५ रुपये प्रति किलो दराने बाजारात होती. त्यासोबतच पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. मेथी ८० रुपये किलो, पालक ३० रुपये किलो दर किरकोळ बाजारात होता.
ग्राहकांचा खिसा रिकामा
सध्या बाजारात आवक कमी असल्याने भाज्यांचे भाव गगनाला पोहचले आहेत. पितृपक्षामुळे श्राद्ध विधीसाठी लागणाºया भाज्या तरी घेण्यासाठी बाहेर पडलेल्या जळगावकरांचा खिसा भाजी खरेदीत रिकामा होत आहे.