जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:13+5:302021-04-26T04:14:13+5:30

- ५३ हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा हप्ता - ३७५ कोटींची मिळाली नुकसान भरपाई - शेतकऱ्यांनी ३६ कोटी रुपयांचा ...

The biggest compensation ever received by the banana growers in the district | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाई

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाई

Next

- ५३ हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा हप्ता

- ३७५ कोटींची मिळाली नुकसान भरपाई

- शेतकऱ्यांनी ३६ कोटी रुपयांचा भरला होता हप्ता

- राज्यातील १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ

- राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या एकूण रकमेच्या, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४५ टक्के मिळाली नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक फटका बसत होता. त्यातच केळीला योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. मात्र, २०१९-२०२० या वर्षात हवामान फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे.

जिल्ह्यातील ५३ हजार उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत हप्ते भरले होते. त्यात राज्य व केंद्र शासनानेदेखील आपलेही हप्ते भरून, शेतकऱ्यांना एकप्रकारे भरभक्कम आर्थिक मदत मिळवून दिली आहे. जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ३७५ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीद्वारे अदा करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणातील रक्कम प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात एकूण ८०० कोटींची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला तब्बल ३७५ कोटी म्हणजेच एकूण रकमेच्या ४५ टक्के रक्कम ही जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून केळी पिकाला कंटाळलेले शेतकरी पुन्हा केळीची लागवड करू लागले आहेत.

थकीत २० कोटींची रक्कम झाली अदा

शेतकऱ्यांना गेल्यावर्षी फळपीक विमा योजनेअंतर्गत जास्त तापमान, कमी तापमान यामध्ये नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम तर मिळाली होती. त्यातच वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याला केळी उत्पादक शेतकऱ्यांनादेखील नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून अदा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नव्हती मात्र गेल्या आठवड्यात उर्वरित पाच हजार शेतकऱ्यांनादेखील वीस कोटी रुपयांची अदायगी करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीदेखील राज्य व केंद्र शासनाकडे चांगलाच पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यावर्षी यश मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांनी याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील राज्य शासनाकडे पाठपुरावा करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरभक्कम नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त करून दिली आहे.

मात्र यावर्षी नुकसानभरपाईची रक्कम मिळणे कठीण?

गेल्यावर्षी शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाईची रक्कम मिळाली असली, तरी यावर्षी शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम मिळणे कठीण आहे. फळपीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर ही लाभ मिळणे कठीण होणार आहे. याबाबत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनदेखील अद्यापही राज्य शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे केंद्र शासनाने याबाबत राज्य शासनाला पत्र पाठवून पुन्हा निविदा काढून निकष बदलण्याबतच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजूनही याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. केळी पीक विमा योजनेअंतर्गत निकषांमध्ये बदल केल्यामुळे या वर्षी केवळ २४ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर गेल्या वर्षी तब्बल ५३ हजार शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला होता.

Web Title: The biggest compensation ever received by the banana growers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.