दुचाकीचोरीचे सत्र सुरूच दोन दुचाकी लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:58+5:302021-05-22T04:15:58+5:30
जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. रात्री तर सोडाच भरदिवसादेखील रस्त्यांवरून दुचाकी चोरून नेल्या जात आहे. भुसावळ-नशिराबाद ...
जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. रात्री तर सोडाच भरदिवसादेखील रस्त्यांवरून दुचाकी चोरून नेल्या जात आहे. भुसावळ-नशिराबाद रस्ता व मु. जे. महाविद्यालयाजवळून दुचाकीचोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी नशिराबाद व रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव येथील रहिवासी कुलदीप देशमुख यांनी बुधवारी भुसावळ-नशिराबाद रस्त्यावरील कपूर पेट्रोल पंपाजवळ त्यांची दुचाकी (एमएच.१९.टीएम.८८४९) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात येताच देशमुख यांनी नशिराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी उभी करून मित्रासोबत गेला अन् दुचाकी लंपास
गौरव पांडुरंग चौधरी हा तरुण विद्यानगरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. ३ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा मु. जे. महाविद्यालयाजवळ दुचाकीने (एमएच.१२.एचटी.२४९४) होता. नंतर साईप्रसाद स्टेशनरी दुकानासमोर दुचाकी उभी करून मित्रासोबत सिध्दिविनायकनगर येथे गेला. अर्ध्या तासानंतर पुन्हा मु. जे. महाविद्यालयाजवळ पोहोचल्यानंतर गौरव यास त्याची दुचाकी दिसून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन ती मिळून आली नाही. अखेर दुचाकी न मिळाल्यामुळे गुरुवारी त्याने दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.