अबब !ऑनलाईन परीक्षेच्या खर्चाचे बिल पाच कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:54+5:302021-04-30T04:20:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. साहजिकच, ऑनलाईन परीक्षेचा खर्च हा ऑफलाईन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. साहजिकच, ऑनलाईन परीक्षेचा खर्च हा ऑफलाईन परीक्षेपेक्षा कमी असायला हवा; पण गोपनीय कामे व ऑक्टोबर-२०२० या ऑनलाईन परीक्षेची खर्चाची बिले ही पाच कोटी रुपयांची सादर करण्यात आली. विशेष म्हणजे, या बिलात मक्तेदाराने विद्यापीठाला तब्बल ७५ लाख रुपयांची सूट दिली. त्यातून स्पष्ट होते की, अवास्तव दर आकारून विद्यापीठाचे आर्थिक नुकसान गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आपण तक्रार केली असून, चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
विद्यापीठातील परीक्षा विभागात गेल्या चार वर्षांपासून गोपनीय कामांच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा थेट आरोपसुद्धा भंगाळे यांनी केला आहे. एकाच मक्तेदाराला चार वर्षांपासून गोपनीय कामे दिली जात आहेत. त्यामध्ये वेगवेगळे अर्थ शीर्षक तयार करून ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या दृष्टीने त्याच मक्तेदाराला एका पानासाठी अवास्तव दराला मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षा होत आहे. कमी खर्च लागताना बिल अधिक असल्यामुळे भ्रष्टाचार होत असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.
महत्त्वाची कागदपत्रे भंगाळेंच्या हाती
निविदा प्रक्रिया न राबविता संबंधित मक्तेदाराची बिले मंजूर करून रक्कम अदा केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. परीक्षा विभागातील तीन टप्प्यांतील कामांची सुमारे ५ कोटी ३ लाख ९५ हजार रुपयांची बिले मक्तेदाराकडून सादर करण्यात आली आहेत. त्यात तिसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा बिलाची रक्कम ही २ कोटी ८ लाख ४२ हजार रुपये आहे. मात्र, मक्तेदाराकडून अवास्तव दर आकारले असल्याचे विद्यापीठाच्या लक्षात येताच, त्यांनी मक्तेदारास बोलवून चर्चा केली व अखेर चर्चेअंती मक्तेदाराने तब्बल ७५ लाख रुपयांची सूट विद्यापीठाला दिली. ही सूट कुठल्या आधारावर दिली व आधीच विद्यापीठाने दर तपासले नाहीत का? बिले कशी दाखल करून घेतली, असा सवाल विष्णू भंगाळे यांनी तक्रारीतून उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणासंदर्भातील काही कागदपत्रे त्यांच्याकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्याच्या बिलांची शहानिशा करा...
प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन हे नाशिक येथून विद्यापीठाचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे सध्याचे बिलदेखील मागील बिलाप्रमाणे अवास्तव असू शकते. त्यामुळे त्यांनी शहानिशा करूनच बिलांना मंजुरी द्यावी. तसेच संबंधित मक्तेदाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिलांमध्ये एक ते सव्वा कोटी रुपयांची सूट आणखी द्यावी, अशी मागणी भंगाळे यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. परिणामी, पालकांवरसुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जे शुल्क आकारले असतील, ते परत करण्यात यावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
थँक्स म्हणा...
मक्तेदाराने बिलामध्ये सूट दिल्याबाबत विद्यापीठाने पत्र काढले आहे. त्यावर कुलगुरूंनी स्वाक्षरी केली आहे. सूट मिळाली म्हणून स्वाक्षरीसोबतच त्यांनी मक्तेदार यांना थँक यू म्हणावे, असाही शेरा दिला आहे.
सखोल चौकशी करण्यात येईल
विद्यापीठात अवास्तव बिल मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार करण्यासाठी गुरुवारी जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याशी थेट संपर्क साधला. किती बिल सादर झाले, त्यात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची त्यांनी तक्रार केली. तर सिनेट सदस्य भंगाळे यांनीदेखील तक्रारीची माहिती त्यांना दिली. त्यावर कुलगुरू यांनी त्यांना भेटण्यास बोलाविले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कुलगुरू व मराठे यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप मराठे यांनी माध्यमांना दिली आहे.