मेहरूण तलावातील जैव विविधता बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 01:03 PM2020-05-22T13:03:24+5:302020-05-22T13:03:35+5:30

अजय पाटील । जळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे पर्यावरणात फार मोठे बदल झालेले पहायला मिळत ...

Biodiversity flourished in Mehrun Lake | मेहरूण तलावातील जैव विविधता बहरली

मेहरूण तलावातील जैव विविधता बहरली

googlenewsNext

अजय पाटील ।
जळगाव : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे पर्यावरणात फार मोठे बदल झालेले पहायला मिळत आहेत. प्रदूषणाचा स्तर कमी होऊन वन्यप्राण्यांचाही वावर आता सर्वत्र होताना दिसू लागला आहे. शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या ठिकाणीही मानवी वावर कमी झाल्याने तलावातील जैव विविधता आता बहरू लागली आहे.
कधीकाळी मेहरूण तलाव परिसरात पट्टेदार वाघांचेही अस्तित्व होते. मात्र, काही वर्षांपासून जळगाव शहराचे वाढत जाणारे क्षेत्र, तलाव परिसरात होणारे अतिक्रमण, तलावात आजूबाजुच्या भागातील घरांचे जाणारे सांडपाणी व तलाव परिसरात वाढत जाणारा मानवी वावर यामुळे तलावातील समृध्द जैव विविधता धोक्यात आली आहे. विदेशी स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन असलेल्या मेहरूण तलावात काही वर्षांपासून पक्ष्यांचेही आगमन कमी होऊ लागले आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मानवी जीवनावर कोरोना सारख्या आजाराने घातक परिणाम केला असताना, कोरोनामुळे मेहरूण तलाव भागात मानवी वावर कमी झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांचे थवेच्या थवे मेहरूण तलाव परिसरात आढळून येत आहेत. यासह फुलापाखरांचा वावर मेहरूण तलाव परिसरात वाढला आहे. यासह मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने तलावातील मासेमारीदेखील थांबली आहे. त्यामुळे ५ प्रकारचे मासे सापडणाऱ्या माशांनाही यामुळे जीवदान मिळत आहे. जिल्ह्यासह शहराच्या दृष्टीनेदेखील मेहरूण तलावाचे मोठे महत्त्व आहे. तलाव परिसरातील जैव विविधता लक्षात घेता भविष्यात या ठिकाणी रिसर्च सेंटर सुरू करता येऊ शकते. यासह मनपाकडून या परिसरात बटरफ्लाय गार्डनदेखील प्रस्तावित आहे. पर्यावरणप्रेमींसाठी हे अभ्यासासाठी विद्यापीठ ठरू शकते.

मानवी वावर कमी झाल्याने फायदा
- मेहरुण तलावाच्या ६२ हेक्टरमध्ये एकेकाळी ५८ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आज प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे नष्ट होत आहे. येथे १५ ते २० सर्पांच्या प्रजातींचा अधिवास आहे. ४० प्रकारची फुलपाखरे, ११८ प्रकारचे विविध किटक , २३ प्रकारच्या गवताळ वनस्पती, ५ प्रकारचे मासे यांचा तलावावर अधिवास आहे़ शेकडो पान वनस्पतींचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.
- तलावाकाठावर गुरांना धुण्यासाठी येणाºयांचेही प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण थांबले आहे. मात्र, अजूनही आजूबाजुच्या परिसरातून सांडपाणी थेट तलावात जात आहे. यावर बंदोबस्त केला तर जलप्रदूषणदेखील थांबणार आहे. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

तरुण मुलांची संख्या मेहरूण तलावात अधिक असायची, त्यात अनेक युवक तलावात दगडदेखील मारायचे यामुळे पक्ष्यांना हा अधिवास धोकेदायक वाटू लागत होता. मात्र,आता मानवी वर्दळ कमी झाल्याने त्याचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर झाला आहे. भविष्यात याच प्रकारे वर्दळ कमी झाली तर जैव विविधता आणखीन बहरू शकते.
-राजेंद्र गाडगीळ,
पक्षी निरीक्षक

लॉकडाउनमुळे जैव विविधता बहरली असली तरी हे केवळ लॉकडाउनच्या काळापुरतीच राहील, आता लॉकडाउनमुळे जी जैव विविधता बहरली आहे. ती कायम वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तलावात येणारे सांडपाणी रोखणे गरजेचे आहे. तसेच तलाव परिसरात वाहनांना बंदी घालावी यामुळे भविष्यातही ही जैव विविधता कायम राहिल.
-सुजाता देशपांडे, अध्यक्षा, भारती फाउंडेशन.

Web Title: Biodiversity flourished in Mehrun Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.