बर्ड फ्ल्यूचे संकट दारात पण भार फक्त ४० टक्के कर्मचाऱ्यांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:39+5:302021-02-06T04:27:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खान्देशात नवापूरातील कोंबड्या तापाने फणफणल्या आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा जास्त पक्षांवर बर्ड फ्ल्यूचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खान्देशात नवापूरातील कोंबड्या तापाने फणफणल्या आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा जास्त पक्षांवर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावत असले तरी जिल्हा पशु संवर्धन विभागात ६० टक्के पदे रिक्त आहेत. पशु संवर्धनचा कारभार हा फक्त ४० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील ज्या मृत पक्षांचे नमुने भोपाळला पाठवले होते. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्यातरी या जिल्ह्यात बर्डफ्ल्यूचा शिरकाव झालेला नाही.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये असलेल्या पोल्ट्री फार्ममध्येच १० ते १२ लाखांपेक्षा जास्त पक्षी आहेत. या सर्व पोल्ट्रीफार्मची तपासणी जिल्ह्यातील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली असून त्यांची काळजी घेण्याच्या सुचना देखील करण्यात आल्या आहेत.
पाच तालुक्यांतून पाठवले होते नमुने
जामनेर, धरणगाव, रावेर चाळीसगाव आणि एरंडोल या पाच तालुक्यांतून मृत पक्षांचे नमुने जिल्हा पशुवैद्यकीय विभागाने भोपाळला तपासणीसाठी पाठवले होते. सुदैवाने हे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात फोन आल्यानंतर अधिकारी तातडीने मृत पक्षांचे नमुने घेऊन ते भोपाळला पाठवतात.
जिल्ह्यात १७० पशुचिकित्सालय
जिल्ह्यात तब्बल १७० पशुचिकित्सालय आहेत. या पशुचिकित्सालयांमधील डॉक्टरांनी जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी केली आहे. तसेच त्यांना योग्य त्या सुचना देखील दिल्या आहेत. नियमीत मृत्यू दरापेक्षा जर जास्त मृत्यू झाले तर त्याची तातडीने माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
चिकन आणि अंड्यांचे दर घसरले
बर्ड फ्लु भारतातील काही राज्यांमध्ये आढळून आल्यानंतर चिकन आणि अंडी यांचे भाव घसरले होते. त्यानंतर च्या काळात भाव स्थिर होते. मात्र आज नवापूरला २० हजार पक्षांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा कोंबडी आणि अंड्यांचे भाव घसरु लागले आहेत.