‘द बर्थ आॅफ व्हीनस’ रोमन ‘रती’ची जन्मकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 05:28 PM2018-02-07T17:28:22+5:302018-02-07T17:30:36+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंगसंगती’ या सदरात अ‍ॅड.सुशील अत्रे यांचा विशेष लेख.

 'Birth of the Birth of Venus' Roman 'Rati' | ‘द बर्थ आॅफ व्हीनस’ रोमन ‘रती’ची जन्मकथा

‘द बर्थ आॅफ व्हीनस’ रोमन ‘रती’ची जन्मकथा

googlenewsNext

‘व्हीनस’ ही रोमन पुराण कथेप्रमाणे प्रेम, सौंदर्य आणि काम यांची देवता आहे. त्यामुळे ती निखळ सौंदर्यवती असणारच. तुलनाच करायची झाली तर आपल्याकडच्या ‘रती’शी तिची तुलना करता येईल. पण आपल्या शैक्षणिक कथांमध्ये ‘रती’ही काही मुख्य देवता नाही. ती मदनाची बायको आहे, इतकंच ! व्हीनस मात्र ग्रीक-रोमन पुराणकथांमध्ये एक प्रमुख देवता आहे. आणि हो- ती त्यांच्या ‘मदना’ची चक्क आई आहे; बायको नव्हे, ‘क्युपिड’ म्हणजे त्यांचा कामदेव-मदन. त्याचा जन्म व्हीनसच्या पोटी झाला. स्वत: ‘व्हीनस’चा जन्म मात्र कोणाच्याच पोटी झालेला नाही. आपल्याकडच्या याज्ञसेनी द्रौपदीप्रमाणेच व्हीनससुद्धा ‘अगर्भजन्मा’ आहे. कथा सांगते की, व्हीनस समुद्र फेसातून जन्माला आली आणि युवती म्हणूनच जन्माला आली. तिला बालपणच नाही. समुद्रात जन्माला आल्यावर लगेच ती एका शिंपल्यावरून किनाºयावर आली आणि समुद्रातून येऊन किनाºयापाशी ती पोहोचल्याचा जो क्षण आहे, तो क्षण या चित्रात दाखवलाय. चित्राला जरी ‘बर्थ आॅफ व्हीनस’ असं नाव असलं, तरी प्रत्यक्षात त्यात व्हीनसचा जन्म नव्हे, तर तिचं जमिनीवर अवतीर्ण होणं चित्रित केलंय!
‘सॅण्ड्रो बॉटिचेली’ हा पंधराव्या शतकातला एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार होऊन गेला. त्याने सन १४८५ च्या सुमारास ‘द बर्थ आॅफ व्हीनस’ हे चित्र काढलंय. तेसुद्धा इटलीमधल्या फ्लोरेन्स या शहरात ‘उफीझी आर्ट गॅलरी’ या ठिकाणी आहे. ‘रेनेसन्स’ चित्र शैलीतील हे एक महत्त्वाचं चित्र मानलं जातं. त्याकाळी लाकडी फळीवरती किंवा भिंतीवरती चित्र काढण्याची पद्धत सर्वमान्य होती. कॅनव्हासचा वापर फारच क्वचित होत असे. अशा काळात बॉटिचेलीने कॅनव्हासचा वापर करून सुमारे ६ फूट बाय ९ फूट एवढं मोठं चित्र काढलं. यात कॅनव्हासही एक सलग नाही. त्याचे दोन तुकडे जोडून चित्र तयार झालंय. त्यासाठी रंगांचं माध्यमही पारंपरिक वापरलं होतं. त्याला ‘टेम्पेरा’ असं म्हणतात. म्हणजे अंड्यांचा बलक किंवा तत्सम पदार्थाचा वापर करून घोटीव रंग तयार करत असत. तैलरंगाची प्रथा अद्याप रूढ व्हायची होती. ‘जुनं ते सोनं’ असं आपण जे म्हणतो, ते या रंग माध्यमाला लागू पडतं बहुदा. कारण ‘टेम्पेरा’ माध्यमाने रंगवलेली चित्रं वर्षानुवर्षे टिकली आहेत.
बॉटिचेलीच्या चित्रांचे विषय बहुदा ग्रीक-रोमन पुराणकथांवर आधारित असेच आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रांची शैलीसुद्धा रोमन प्राचीन चित्रशैलीवरच आधारलेली आहे. पहिल्या-दुसºया शतकात व्हीनसचे जे रोमन शैलीतील संगमरवरी पुतळे घडवले गेले. त्या पुतळ्यांमधील व्हीनस ज्या पवित्र्यात आहे, तशीच बॉटिचेलीनेही रंगवली.
ग्रीक-रोमन कालखंडात विविध देव-देवतांचे अत्यंत प्रमाणबद्ध, रेखीव आणि नग्न पुतळेही अगदी सर्वसामान्य बाब होती. मात्र नंतरच्या कालखंडात ख्रिश्चन धर्माचा प्रभाव या चित्र आणि शिल्पकलेवर पडला; आणि पुढची अनेक वर्षे चित्रकला ही येशूशी आणि चर्चशी निगडित, आणि कर्मठ चौकटीतच राहिली. ‘द बर्थ आॅफ व्हीनस’ या चित्राचं मुख्य वैशिष्ट्य हेच आहे, की कित्येक वर्षांनंतर त्यात पुन्हा नग्नता चित्रित झाली. शेकडो वर्षांपूर्वी संगमरवरी पुतळ्यांंतली व्हीनस ज्या प्रकारे आपल्या हातांनी आपली नग्नता झाकताना दिसली होती. अगदी तशीच या चित्रात ती दिसली; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जुन्या, प्राचीन व्हीनसप्रमाणे ही प्रमाणबद्ध वगैरे अजिबात नाही. उलटपक्षी तिची शरीराकृती अत्यंत विसंगत वाटते. तिची मान प्रमाणाबाहेर लांबलचक झालीय. आणि डावा खांदा तर इतका खाली उतरलाय, की ते एखाद्याला शारीरिक व्यंग वाटावं! पण तिचा चेहरा मात्र अत्यंत रेखीव आहे. ती चित्रात मध्यभागी आहे प्रमुख पात्र! तिच्या एका बाजूला ‘झेफर’ हा वायुदेव किंवा ‘पवन’ आहे. सोबत त्याची सखी वायुदेवता आहे. दोघेही फुंकर घालून ‘व्हीनस’च्या शिंपल्याला किनाºयाकडे आणताहेत. त्यातही स्वत: झेफर जोरात फुंकर घालतोय, त्यामुळे त्याचा चेहरा श्रमाने लालबुंद झालाय. दुसºया बाजूला ‘होरा’ ही अप्सरा उभी आहे. निसर्गावस्थेतल्या व्हीनसने जमिनीवर पाऊल ठेवताबरोबर तिला झाकण्यासाठी या होराच्या हातात एक वस्त्र अगदी तयार आहे. स्वत: व्हीनसला मात्र आपल्या अवस्थेचं फारसं काही अप्रूप नाही, तिच्या चेहºयावरचे भाव निरागस, अल्लड मुलीचेच आहेत. सहज जाता जाता... इतकी सुरेख आणि धाडसी चित्रं त्याकाळी काढणारा बॉटिचेली पुढे काही वर्षांनी एका धर्मगुरुच्या इतका प्रभावाखाली आला, की त्याने आपली स्वत:चीच अनेक चित्रे ‘धर्मविरोधी’ आहेत, म्हणून जाळून टाकली!
-सुदैवाने ‘द बर्थ आॅफ व्हीनस’ त्यातून वाचलं, आणि जगप्रसिद्ध झालं.

Web Title:  'Birth of the Birth of Venus' Roman 'Rati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.