गेल्या वर्षीपेक्षा मुलींचा जन्मदर घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:02+5:302021-09-21T04:18:02+5:30

स्टार डमी नंबर १२०३ आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एक हजार मुलांमागे असलेले मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी ...

The birth rate of girls is lower than last year | गेल्या वर्षीपेक्षा मुलींचा जन्मदर घटला

गेल्या वर्षीपेक्षा मुलींचा जन्मदर घटला

Next

स्टार डमी नंबर १२०३

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एक हजार मुलांमागे असलेले मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी मध्यंतरी जिल्ह्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले होते; मात्र कोविडच्या या दीड वर्षाच्या काळात या अभियानावरही परिणाम झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत असून, २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये मुलींचा जन्मदर हा घटून ९०९ झाला आहे.

२०१९ मध्ये एक हजार मुलांमागे ९२५ मुली होत्या. ही संख्या वाढण्याची अपेक्षा असताना; मात्र ती संख्या कमी झाल्याने आता अभियानात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय कोविडच्या काळात प्रसूतींची आकडेवारी व्यवस्थित नसल्याचाही एक घोळ समोर येत आहे. जिल्ह्यात २०१६ मध्ये अत्यंत कमी असलेले हे प्रमाण हळूहळू वाढू लागले. पीसीपीएनडीटीची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने शिवाय कन्या जन्माचे स्वागत व प्रोत्साहन मिळाल्याने हे प्रमाण वाढून २०१९ पर्यंत ९२५ वर आलेले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी यात पुढाकार घेऊन गुड्डा-गुड्डी या डिजिटल बोर्डची संकल्पना मांडली होती. यात मुलींच्या जन्माबाबत प्रोत्साहन तसेच जनजागृतीपर व्हिडिओ दाखविले जात होते; मात्र हा बोर्ड आता शासकीय कार्यालयात नाही, त्यामुळे जनजागृतीबाबत उदासिनता दिसून येत आहे.

असे आहे एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर

२०१७ -२०१८ -९०९

२०१९ -२०२० - ९२५

२०२० -२०२१ - ९०९

लिंगनिदानाला बंदी

लिंगनिदानाला बंदी असून, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत यात कारवाई केली जाते. दरम्यान, जिल्ह्यात ही समितीही असून, त्यांची बैठक जिल्हा शल्यचिकित्सकांकडे होत असते. जिल्हा रुग्णालयात हा विभाग आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते. शिवाय विविध योजना यासाठी कार्यरत आहेत. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असतात. यात मातांचा सन्मान करणे, प्रोत्साहन देणे या बाबी असतात. हे अभियान अधिक जोमाने राबविले जाईल- डॉ.बी.टी.जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी.

समन्वयाचा अभाव

जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीटी विभागात समन्वयाचा अभाव समोर आला आहे. जन्मदराबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात माहिती मागितल्यानंतर ही सर्व माहिती जिल्हा रुग्णालयात मिळेल, असे सांगण्यात आले; मात्र जिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर ही माहिती आमच्याकडे नसते, असे सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय विभागात आकडेवारीवरून समन्वय नसल्याचे समोर आले आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांची आकडेवारीच जि.प.कडे उपलब्ध नसल्याची बाबही यात समोर आली आहे.

तालुकानिहाय प्रमाण असे (सन २०२०/२१)

अमळनेर ९२४

भडगाव ८५०

भुसावळ ९५२

चाळीसगाव ९०६

चोपडा ९२१

धरणगाव ९५४

एरंडोल ८८३

जळगाव ९१९

जामनेर ८९१

मुक्ताईनगर ९१३

पाचोरा ९२०

पारोळा ८३४

रावेर ८७४

यावल ९२६

जळगाव शहर ९१०

Web Title: The birth rate of girls is lower than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.